भाऊ, शिवसेनेत परत या! 

श्रीकांत पाचकवडे
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या सेनेला गुलाबरावांची पक्षात उणीव जाणवत आहे. शिवसेना आणि गुलाबराव हे समीकरण पुन्हा जुळविण्यासाठी सेनेतील काही नेते व निष्ठावंत शिवसैनिक प्रयत्नशील आहेत.

अकोला : वऱ्हाडाच्या राजकारणात शिवसेनेचा बुलंद आवाज असणारे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी सेनेला 'जय महाराष्ट्र' करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हातात बांधले. मात्र, जुन्या-जाणत्या शिवसैनिकांना गुलाबरावांची पक्षात उणीव भासत असल्याने त्यांनी गावंडेंना पुन्हा शिवसेनेत परत येण्याची गळ घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांनी बुधवारी गुलाबरावांच्या आश्रमात जाऊन घेतलेल्या भेटीमागेही हाच तर्क लावला जात आहे. 

वऱ्हाडाच्या राजकारणात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करून गाव तेथे शिवसेना आणि घर तेथे शिवसैनिक तयार करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी नुकतेच राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. शिवसेनेत सुरू असलेल्या घुसमटीमुळे त्रस्त झालेल्या गुलाबरावांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यानंतर अकोल्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण वऱ्हाडाच्या राजकारणात खळबळ उडाली. शिवसेनेच्या तालमीत आपले वेगळे राजकीय वलय निर्माण करणारे गुलाबराव राष्ट्रवादीत गेले असले तरी त्यांच्या गळ्यातील भगवे उपरणे अजुनही निघालेले नाही. 

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या सेनेला गुलाबरावांची पक्षात उणीव जाणवत आहे. शिवसेना आणि गुलाबराव हे समीकरण पुन्हा जुळविण्यासाठी सेनेतील काही नेते व निष्ठावंत शिवसैनिक प्रयत्नशील आहेत. महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेमुळे वीसपैकी अनेक प्रभागात गुलाबराव गावंडेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सेनेतील काही नेत्यांनी गुलाबरावांची पुन्हा मनधरणी करणे सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळवयाचे असेल, तर गुलाबराव सेनेत असणे गरजेचे आहे. त्यामुळे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांनी गुलाबराव गावंडेंची त्यांच्या आश्रमात जाऊन भेट घेतली.

या भेटीत काय चर्चा झाली? हे अद्याप उघड झाले नसले तरी आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गुलाबराव गावंडेंना पुन्हा सेनेत येण्याची गळ घालण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Shiv Sena trying to bring Gulabrao Gawande back into the party