राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक बांधणार शिवबंधन

दिनकर गुल्हाने
रविवार, 28 जुलै 2019

पुसद (जि. यवतमाळ), : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत शिवसेनेला उभारी मिळाली होती. त्याच शिवसेनेत सहा दशकांनंतर वसंतराव नाईक यांचे नातू व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक प्रवेश करणार आहेत.

पुसद (जि. यवतमाळ), : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत शिवसेनेला उभारी मिळाली होती. त्याच शिवसेनेत सहा दशकांनंतर वसंतराव नाईक यांचे नातू व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक प्रवेश करणार आहेत.
मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाल्यानंतर इंद्रनील नाईक शनिवारी (ता.27) पुसद येथे परत येत आहेत. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ते मंगळवारी वा बुधवारी मुंबई येथे "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधतील. त्यानंतर त्यांचे वडील आमदार मनोहर नाईक, ज्येष्ठ पुत्र ययाती नाईक व कुटुंबीयांसोबत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात पुसद विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकमेव गड राहिला आहे. आमदार मनोहर नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भातील एकमेव आमदार आहेत. नाईक घराण्याच्या शिवसेनेत होणाऱ्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार पडणार आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून पुसद विधानसभा मतदारसंघावर नाईक घराण्याचे वर्चस्व आहे. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे 11 वर्षे कॉंग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पुसद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सुधाकरराव नाईक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नाईक घराण्याचे वर्चस्व असलेला पुसदचा गड राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनला. त्यानंतर पाच वेळा आमदार झालेले मनोहर नाईक दहा वर्षे राज्यमंत्रिमंडळात अन्न व औषधी प्रशासन मंत्री बनले. मोदी लाटेच्या पडझडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मनोहर नाईक यांना 65 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते.
केंद्रात मोदी सरकार दुसऱ्यावेळी तगड्या बहुमताने विराजमान झाल्यानंतर राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना ओहोटी लागलेली आहे. नाईक घराण्यातील ऍड. निलय नाईक यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी मिळाली. मनोहर नाईक यांचे कनिष्ठ पुत्र इंद्रनील नाईक यांनी राजकीय पर्याय निवडण्याचा विचार केलेला होता. पुसद विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाटेला असल्याने शिवबंधन बांधण्याची त्यांनी तयारी केली. यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पुसद विधानसभेत शिवसेनेला सहा हजार मतांची आघाडी मिळाली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivbandhan will construct NCP's Indranil Naik