शिवसेना नगरसेवकांना फरफटत सभागृहाबाहेर काढले (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

  • अमृतच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप
  • चर्चा नाकारल्याने सभागृहात माईकची तोडफोड 
  • शिवसेना गटनेते राजेश मिश्रा, गजानन चव्हाण तीन साभांसाठी निलंबित

अकोला : अमृत योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा व इतर सदस्यांनी महानगरपालिका सभागृहात ठिय्या आंदोलन केले. मागील सभेत दिलेल्या आश्वासनानुसार चर्चा नाकारल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी माईकची तोडून थेट महापौरांपुढे गोंधळ घातला. राजेश मिश्रा आणि गजानन चव्हाण यांना तीन सभांसाठी निलंबित करण्यात आले. पोलिसांना सभागृहात बोलावून सदस्यांना फरपटत बाहेर काढण्यात आले.

अमृत योजने अंतर्गत शहरात करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून 14 कोटीचा अपहार झाल्याचा आरोप राजेश मिश्रा यांनी चर्चा करण्याची मागणी केली. यावर सभागृहात चर्चा झाली असल्याने पुन्हा चर्चा करण्यास महापौर विजय अग्रवाल यांनी नकार दिला. त्यामुळे शिवसेना सदस्य महापोरांपुढील मोकळ्या जागेत पोहचले आणि चर्चेची मागणी करू लागते. मात्र महापौर चर्चा न करण्यावर ठाम राहिले. त्यामुळे मिश्रा यांनी माईक फेकून तोडफोड केली. राजदंडापर्यंत शिवसेनेचे सदस्य पोहचले. त्यामुळे महापौरांनी मिश्रा यांना तीन सभेसाठी निलंबित केले. त्यांनंतर गजानन चव्हाण मोर्चा सांभाळला. तेव्हा चव्हाण यांनाही तीन सभेसाठी निलंबित करण्यात आले.

त्यानंतरसुद्धा शिवसेना सदस्यांनी सभागृहात ठिय्या दिला. अखेर पोलिसांना सभागृहात बोलाविले व निलंबित सदस्यांना बाहेर काढण्याचा आदेश दिला. पोलिस कारवाई करीत नसल्याने कोतवालीचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांना बोलाविण्यात आले. त्यावर विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी जोरदार आक्षेप घेतला. अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने सभागृहात आले. त्यांनी सदस्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना सदस्य सभागृहातच बसून राहिले. त्यामुळे त्यांना पोलिसांनी बळजबरीने अक्षरशः फरपटत सभागृहाबाहेर काढले. त्यांना सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यांनंतर सभा पुढे सुरू करण्यात आली.

 

Web Title: Shivsena corporators were sacked out by mayor Video