शिवसेना पूर्व विदर्भात मारणार मुसंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नागपूर : पूर्व विदर्भात विधानसभेच्या 15 ते 20 आणि लोकसभेच्या किमान चार जागांसह शिवसेना मुसंडी मारेल असा विश्‍वास शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केला. सर्व निवडणुका स्वबळावरच लढणार, गडकरींनाही सोडणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

नागपूर : पूर्व विदर्भात विधानसभेच्या 15 ते 20 आणि लोकसभेच्या किमान चार जागांसह शिवसेना मुसंडी मारेल असा विश्‍वास शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केला. सर्व निवडणुका स्वबळावरच लढणार, गडकरींनाही सोडणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेनेतर्फे गुरुवारी वर्धमाननगरातील हार्दिक लॉनमध्ये आयोजित पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभेत चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा-गोंदियासह विधानसभेच्या 15 ते 20 जागा निश्‍चितच मिळविता येतील. निवडणुका स्वतंत्रच लढणार, भाजपसोबत जाणार नाही, तिसरी आघाडी किंवा कॉंग्रेससोबत जाण्याचा प्रश्‍नच नाही.
यापूर्वी कॉंग्रेस विरोधी मतांची आम्हाला साथ होती. आता संघटना बांधणीवर आवश्‍यक आहे. बूथनिहाय नियुक्‍त्यांसह एकही पद रिकामे राहू नये, याची काळजी घेतली जाईल. पदाधिकाऱ्यांवर नियंत्रणासाठी समन्वयक म्हणून अनिल नेरकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्व गटतट मोडून काढले जाईल. जुन्या शिवसैनिकांना परत बोलावून जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. 10 दिवसांमध्ये नागपूरची कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला खासदार आनंदराव अडसूळ, खासदार कृपाल तुमाने, उपनेते अशोक शिंदे, आमदार बाळू धानोरकर, जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव उपस्थित होते.
मंदिर हटविण्याच्या कारवाईविरुद्ध संघर्ष
नागपुरात विकासाच्या नावाखाली मंदिर हटविले जात आहेत. रस्त्यावरीलच काय गल्ली बोळातील मंदिरे पाडली जात आहेत. मशिदींना मात्र हात लावला जात नाही. याविरोधात जनतेत रोष असून शिवसैनिक संघर्ष करतील.
मोदींकडे दुर्लक्ष
संसदेत अकडबाज पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्याकडे बघत नाहीत. आम्ही मान द्यायला तयार असलो तरी ते घ्यायला तयार नसल्याने त्यांच्याकडे लक्षच देत नसल्याचे कीर्तिकर यांनी सांगितले. भाजप प्रादेशिक पक्षांना टार्गेट करीत आहे. त्याची किंमत भाजपला निवडणुकांमध्ये कळेल, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: shivsena lead in purva vidarbha