धक्‍कादायक... 30 लाख लोकसंख्या; प्रसूतीसाठी अवघ्या 10 खाटा (व्हिडिओ )

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

रविवारी दिवसभर येथे डॉक्‍टर नसतात. केवळ परिचारिका आणि दोन मावशींच्या भरवशावर हे सूतिकागृह असते. गरज भासली तर ऑन कॉल डॉक्‍टरांना बोलावण्यात येते. यामुळे या सूतिकागृहाचीच शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. 

नागपूर : एखाद्या सिनेमातील दृश्‍याला अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्याही साधन सुविधांशिवाय शक्कल लढवून झालेली प्रसूती हे चित्रपटापुरतं ठीक आहे. मात्र, वास्तवात अत्याधुनिक अशी साधन सामग्री नसल्यास प्रसूत महिलेला हाताळणं अत्यंत अवघड आणि धोकादायक असतं. 30 लाखांच्या नागपूर शहरात महापालिकेजवळ पाचपावली येथील सूतिकागृहात अवघ्या 10 खाटांचा प्रसूती वॉर्ड आहे. 

या दहा खाटांच्या पाचपावली सूतिकागृहागृहात शस्त्रक्रियेची सोय नाही. रविवारी दिवसभर येथे डॉक्‍टर नसतात. केवळ परिचारिका आणि दोन मावशींच्या भरवशावर हे सूतिकागृह असते. गरज भासली तर ऑन कॉल डॉक्‍टरांना बोलावण्यात येते. यामुळे या सूतिकागृहाचीच शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. 

 

शहरातील सामान्य प्रसूतीची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. यासाठी रुग्णालये असावीत. परंतु, पाचपावली येथे दहा खाटांचा प्रसूती वॉर्ड आहे. विशेष असे की, महापालिकेच्या एकाही रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर नाही, अतिदक्षता वॉर्ड नाही. सांगा सुरक्षित प्रसूती कशी होईल? प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव किती प्रमाणात होईल? याचा आधीपासून कोणालाच अंदाज असू शकत नाही. त्यामुळे येथे होणारी प्रसूती धोकादायक ठरू शकते.

अति रक्तस्त्राव झाल्यास किंवा मानसिक दबाव आणि तणावामुळेदेखील जीव गमावण्याची शक्‍यता असते. यामुळेच या सूतिकागृहासमोर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. विशेष असे की, पाचपावली येथील सूतिकागृहात रविवारी डॉक्‍टर असतात "ऑन कॉल.' गंभीर स्थिती निर्माण झाल्यास डॉक्‍टरांना फोन करावा लागतो. नंतरच डॉक्‍टर येतात. रात्री 9 वाजता डॉक्‍टर येतील असा अंदाज व्यक्त केला. 

परिचारिकेच्या भरवशावर महिला 
शहराच्या आरोग्याचा प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका आरोग्यसेवा देण्यात नापास झाली आहे. अवघ्या दहा खाटांच्या भरवशावर महापालिका "प्रसूतीची सोय आहे, असे सांगण्याचा केवळ देखावा करीत आहे. प्रत्यक्षात गंभीर स्थिती निर्माण होताच 108 क्रमांकाच्या गाडीतून थेट मेडिकलमध्ये रेफर करण्यात येते. याशिवाय येथे एक परिचारिका आणि दोन मावशी वॉर्डातील गर्भवती महिलांच्या आरोग्याचा डोलारा सांभाळतात. 
 

दररोज पावणेदोनशे प्रसूती 
नागपूर शहरात मेडिकल, मेयो असे दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत, तर आरोग्य विभागाचे "डागा' स्त्री रुग्णालय आहे. याशिवाय खासगी नर्सिंग होम आहेत. या सर्व संस्थांमध्ये दिवसभरात सुमारे पावणेदोनशे प्रसूती होतात. मेयोत दर दिवसाला सुमारे 30 प्रसूती होतात. मेडिकलमध्ये 35 ते 40 प्रसूती होतात. डागा रुग्णालयात 40 ते 45 प्रसूती होतात. याशिवाय मातृ सेवा संघाच्या सूतिकागृहासह खासगी नर्सिंग होम येथे दिवसाला 25 प्रसूती होतात. 

पाइपलाइन फुटलेली, पाण्याची नासाडी 
पाणी वाचवा असा संदेश महापालिका देते. मात्र, महापालिकेच्या पाचपावली सूतिकागृहात प्रवेश करताच येथे पाइपलाइन फुटलेली असून मागील 15 दिवसांपासून पाणी वाया जात असल्याचे सांगण्यात आले. असा अजब कारभार महापालिकेचा आहे. या पाण्यात दोघे जण घसरून पडले असल्याची माहिती आहे. 

नूतनीकरण सुरू आहे
महापालिकेच्या पाचपावली येथील सूतिकागृहातच प्रसूतीची सोय आहे. येथे 10 खाटा आहेत. इंदिरा गांधी रुग्णालयाचे नूतनीकरण सुरू आहे. 
-डॉ. भावना सोनकुसळे, उपसंचालक, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking ... a population of 3 million; Only 10 cats for delivery in nmc hospital