मनोहर नाईकांसोबत शिवसेनेत जावे की नाही?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

उमरखेड (जि. यवतमाळ) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहर नाईक अखेर पुत्रप्रेमापोटी शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे. ते जर शिवसेनेत गेले तर त्यांच्यासोबत शिवसेनेत जावे की नाही, याबाबत तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

उमरखेड (जि. यवतमाळ) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहर नाईक अखेर पुत्रप्रेमापोटी शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे. ते जर शिवसेनेत गेले तर त्यांच्यासोबत शिवसेनेत जावे की नाही, याबाबत तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेचे दोन सदस्य, पंचायत समितीचे उपसभापतींसह तीन सदस्य व नगरपालिकेत एक नगरसेवक आहे. त्याचबरोबर मनोहर नाईकांना मानणारे कारखान्याचे चार संचालकही आहेत. येथील जिनिंग-प्रेसिंग संस्थेतही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संचालक आहेत. पुसदमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुतांश पदाधिकारी व लोकप्रतिनिधी हे नाईकांबरोबर शिवसेनेत जाणार असले तरी, उमरखेड तालुक्‍यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी मात्र "वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य देवीदास खोकले व पंकज मुडे यांना विचारणा केली असता, खोकले यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, असे सांगितले. पंकज मुडे व पंचायत समितीचे उपसभापती विशाखा जाधव यांनी मात्र, नाईक म्हणतील तीच पूर्व दिशा म्हणून त्यांच्यासोबत जाण्याचा मनोदय व्यक्त केला. नगरसेवक व माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल यांनी मात्र, आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहण्याचा मनोदय व्यक्त केला. स्थानिक राजकारणात सध्या शिवसेनेमध्ये प्रकाश पाटील देवसरकर यांचे वर्चस्व असल्याने व स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचे व देवसरकर यांचे विळ्या-भोपळ्याचे राजकीय वैर असल्याने नाईकांसोबत शिवसेनेत जायचे, तर पुन्हा देवसरकर यांचे नेतृत्व मान्य करावे लागेल, हा एक पेच समोर असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जावे किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Should I join Shiv Sena with Manohar Naik?