मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा

shripadjoshi
shripadjoshi

नागपूर : निमंत्रण वापसीच्या घटनेनंतर चहुबाजुंनी आरोपाच्या फैरी झडल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज (बुधवार) आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मंगळवारी रात्रीपर्यंत संमेलनाच्या उद्घाटकाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत डॉ. जोशी व्यस्त होते. मात्र, यादरम्यान संपूर्ण घडामोडींनी अस्वस्थ झालेल्या महामंडळ अध्यक्षांनी आपल्या एका सहकाऱ्याकडे अश्रूंना वाटही मोकळी करून दिली आणि राजीनाम्याचे सूतोवाचही केले होते. बुधवारी सकाळी त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या अधिकृत इ-मेलवर आपला राजीनामा पाठवला. घडलेल्या प्रकारासाठी कुणीही जबाबदार असले तरी नैतिक जबाबदारी स्वीकारून हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय तीन वर्षांच्या कार्यकाळात आपल्याला दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी महामंडळ व सर्व घटक संस्थांचे आभार मानले आहेत. या राजीनाम्याची एक प्रत त्यांनी महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर यांना पाठविली असून ती प्राप्त झाल्याचेही देवधर यांनी स्पष्ट केले. घटनेनुसार अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास उपाध्यक्षांकडे पदाची जबाबदारी येत असते, त्यामुळे यवतमाळच्या साहित्य संमेलनात विद्या देवधर महामंडळाचे नेतृत्व करतील. याशिवाय उद्या (गुरूवारी) दुपारी २ वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारीणीची बैठक यवतमाळ येथे संमेलनस्थळी होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

माझ्याविरुद्ध कट-कारस्थान रचून मला बळीचा बकरा बनविण्यात आले. परंतु, त्याचा राग संमेलनावर बहिष्कार घालून काढणार नाही. मी संमेलनाला जाणार आहे आणि सर्वांनी संमेलनाला यावे, असे आवाहनही करीत आहे.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com