'श्रीरामा'च्या भेटीसाठी "विठ्ठला'ची वारी!

दिनकर गुल्हाने 
रविवार, 22 डिसेंबर 2019

पुसद येथील श्रीराम पापीनवार यांनी अनेकदा वारीतून विठ्ठलाचे दर्शन घेतले. विठ्ठलाला सोन्याचा दागिना अर्पण करण्याची त्यांची मनस्वी इच्छा. मात्र, अर्धांगवायुमुळे पंढरीची वारी शक्‍य नव्हती. अखेर अदम्य इच्छा शक्तीमुळे खुद्द मंदिर समिती अधिकाऱ्यांनी भेट स्वीकारण्यासाठी पुसद वारी केली. या भेटीमुळे पंच्याहत्तरीतील श्रीराम व अवघे कुटुंबीय आनंदित झाले. 

पुसद (जि. यवतमाळ) : पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकरींचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी पंढरीची वारी नित्तनेमाने करीत असतात. 

पुसद येथील श्रीराम कोंडोपंत पापीनवार हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहे. वय पंचाहत्तरीतील. त्यांनी पुसद ते पंढरपूर अशी अनेकदा वारी केली. वयाची पंच्याहत्तरी गाठली, तशी गात्रे थकलेली. तरीही विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ मनात कायम आहे. विठ्ठलच आपल्यासाठी सर्वकाही आहे, असे ते म्हणतात. विठ्ठलाला सोन्याचा दागिना करावा अशी त्यांची तीव्र इच्छा. मात्र, परिस्थितीने कधी साथ दिली नाही. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने इच्छा पूर्ण करता आली नाही. 

अधिक माहितीसाठी - शेतकऱ्यांना नववर्षाचे गिफ्ट; दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी

मात्र, कालांतराने परिस्थिती सुधारली आणि विठ्ठलासाठी सोन्याचा दागिना तयार केला. आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार अशी स्थिती निर्माण झाली असतानाच श्रीराम यांना अर्धांगवायूचा झटका आला. यामुळे ते खिळखिळ झाले. अशात पंढरपूरचा प्रवास करणे अशक्‍य. स्व:हस्ते शंभर ग्रामचे सोन्याचे बिस्किट विठ्ठलाला अर्पण करण्याची श्रीराम यांची तगमग राहून गेली. मात्र, नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशामुळे श्रीराम पापीनवार यांची इच्छा पूर्ण झाली. 

Image may contain: 3 people

एका फोनने स्वप्न पूर्ण

श्रीराम पापीनवार यांची तगमग पाहून कन्या अनघा विजय चक्रवार यांनी थेट नातेवाईक असलेले माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला. मुनगंटीवार यांचे विशेष कार्याधिकारी भांजेवाले यांनी नागपूर अधिवेशनासाठी आलेले पंढरपूर मंदिराचे लेखापरीक्षक कदम यांना ही बाब सांगितली. भांजेलाल यांना आश्‍वासन देत कदम यांनी बुधवारी (ता. 18) रोजी नागपूरवरून पुसद गाठले. त्यांनी विठ्ठलासाठी सोन्याचा दागिना बनविण्याकरिता श्रीराम पापीनवार यांच्याकडून शंभर ग्रॅमचे सोन्याचे बिस्किट स्वीकारले व रितसर पावती दिली. खुद्द पंढरपूरचे विश्‍वस्त भेटीसाठी आल्याने श्रीराम यांच्यासह कुटुंब भारावून गेले. श्रीराम यांची मुलगी अनघा व पत्नी मंजुषा यांनी विश्‍वस्त मंडळाचे आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shriram wish fulfilled in Yavatmal