शुभम हरला आयुष्याची लढाई; शेतकरी विधवेचा आधारच हरपला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

अनेकांचा मदतीचा हात
शुभमच्या उपचारासाठी मोठा खर्च आला. मुंबई येथील चंद्रा नायक, पांढरकवडा येथील अजय वर्मा, पुणे येथील सचिन लुंकड, मिलिंद पाटील आदींनीही आर्थिक  मदत केली. राज्य शासनाच्या वतीनेही मदत केल्याची माहिती शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.

झरी जामणी (जि. यवतमाळ) - गेल्या २१ दिवसांपासून आयुष्याची लढाई लढत असलेल्या शुभम भोयर याचा नागपूर येथे उपचारादरम्यान सोमवारी (ता. २१) मृत्यू झाला. कुटुंबाचा आधार असलेल्या मुलाच्या निधनाने शेतकरी विधवा लता भोयर यांनी सावरलेल्या संसाराचा आधारच हरपला आहे. या घटनेमुळे तालुक्‍यातील कोसारा गावात आज सर्वत्र शोक दिसून आला.

कोसारा येथील लोकेश्‍वर भोयर यांनी नापिकीला कंटाळून २००६ मध्ये जीवनयात्रा संपविली. पतीच्या निधनानंतर लता भोयर यांनी शुभम व बंटी या मुलांच्या आधाराने संसार सावरला. पाच एकर शेतात घाम गाळून मुलांना शिकविले. शुभम दहावी झाला होता. तर, बंटी नववीत शिकत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर शुभम आईचा आधार बनला होता. त्याने कुटुंबाचा भार सांभाळला होता. परंतु, नियती कोणासोबत कोणता खेळ खेळेल सांगता येत नाही. 

२९ डिसेंबरला गणेशपूर येथून कोसारा येथे येत असताना शुभमच्या दुचाकीला अपघात झाला.  तो पुलाखाली पडला. काका प्रदीप भोयर व नातेवाइकांनी त्याला वणी येथील रुग्णालयात भरती केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे भरती करण्यात आले. तेथे  उपचारादरम्यान २१ दिवसांनंतर मृत्यू झाला. सायंकाळी त्याच्यावर कोसारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अनेकांचा मदतीचा हात
शुभमच्या उपचारासाठी मोठा खर्च आला. मुंबई येथील चंद्रा नायक, पांढरकवडा येथील अजय वर्मा, पुणे येथील सचिन लुंकड, मिलिंद पाटील आदींनीही आर्थिक  मदत केली. राज्य शासनाच्या वतीनेही मदत केल्याची माहिती शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.

Web Title: Shubham lost the battle of life