नागपूरच्या भावंडांचा गोंदियात रेल्वेने कटून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

जेवण झाल्यानंतर दोघेही अंगुर बगीचा परिसरातून जात असलेल्या गोंदिया-बालाघाट रेल्वे रुळावर बसून गप्पा मारीत होते. गप्पांत रममान असताना डेमो रेल्वेगाडी त्यांना दिसली नाही. काही क्षणात दोघेही रेल्वेखाली चिरडले गेले

गोंदिया - रेल्वे रुळावर बसलेल्या दोन भावंडांचा धावत्या रेल्वेने कटून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. 11) रात्री 10 वाजताच्या सुमारास गोंदिया-बालाघाट रेल्वेमार्गावरील अंगुर बगीचा परिसरात घडली. उमेश बिजेवार (वय 23) व अर्जुन बिजेवार (वय 18) अशी मृतांची नावे असून, ते नागपूरजवळील वानाडोंगरी येथील रहिवासी आहेत.

गोंदिया येथील अंगुर बगीचा परिसरातील टिकेश्‍वर कावळे यांच्या घरी स्वागत समारंभाचा कार्यक्रम गुरुवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता वधू पक्षाकडील उमेश व अर्जुन हे दोघे भाऊ आले होते. जेवण झाल्यानंतर दोघेही अंगुर बगीचा परिसरातून जात असलेल्या गोंदिया-बालाघाट रेल्वे रुळावर बसून गप्पा मारीत होते. गप्पांत रममान असताना डेमो रेल्वेगाडी त्यांना दिसली नाही. काही क्षणात दोघेही रेल्वेखाली चिरडले गेले. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आज, शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: siblings died in an accident