सायलेन्स झोन कुठं हाय भाऊ?

file photo
file photo

अमरावती  : शहरात काही शांतताक्षेत्र घोषित आहे. या क्षेत्रात ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार पाचवर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद करण्यात आली. परंतु नियम अस्तित्वात असताना, संबंधित यंत्रणेकडून काटेकोर अंमलबजावणीच होत नसल्याने सायलेन्स झोन कुठं हाय भाऊ, असे प्रश्‍न अनेक जण विचारायला लागलेत.

वाद्य वाजविण्यात मनाई

सणासुदीच्या काळात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी शांतताक्षेत्रात रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यात मनाई आहे. शांतता क्षेत्राची वर्गवारी असून, त्याठिकाणी 50 ते 75 डेझिबलची मर्यादा आहे. पहिल्या कारवाईनंतरही पुन्हा उल्लंघन झाल्यास दररोज पाच हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. 
शाळा, महाविद्यालय, रुग्णालये, प्रार्थनास्थळे, न्यायालयांचाही समावेश आहे. या इमारतींपासून शंभरमीटरच्या आतील क्षेत्र ध्वनी विरहित असावे, असे नियमात सांगण्यात आले. बहुतांश ठिकाणी याच भागात सर्वाधिक ध्वनिदूषण होते. कधी प्रतिष्ठा जपण्याच्या तर, कधी दुसऱ्यांसमोर वेगळेपण दाखविण्याच्या प्रयत्नात नियम पायदळी तुडविल्या जातात.

शहरात होते वारंवार उल्लंघन

अमरावती शहराचा विचार केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा न्यायालयाच्या इमारती काही फुटाच्या अंतरावर आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय भरचौकात आहे. या सर्वच ठिकाणी निदर्शने, आंदोलने, मोर्चे येतात. ध्वनिक्षेपकावरून घोषणा दिल्या जातात. 

उत्सव काळात सायलेन्स झोनची आठवण

सार्वजनिक सण, उत्सव काळातच ध्वनी प्रदूषण होऊ नये त्याला आळा बसावा यादृष्टीने प्रशासनाचे किती प्रयत्न सुरू आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न संबंधित विभागाकडून केल्या जातो. सण, उत्सव संपला की, हे आवाहन हवेत विरते. नाइलाजास्तव पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केल्या जाते. परंतु अमरावतीत या कायद्यान्वये कुणाला शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही.

जनजागृतीचाही अभाव

शहरात किती सायलेन्स झोन आहेत, हेच अद्याप निश्‍चय झालेले नाही. मध्यंतरी महापालिका, पोलिस प्रशासनाच्या वतीने तशी पाहणी झाली होती. काही ठिकाणी थोडीफार दिशादर्शक फलकेही लावलेली होती. परंतु पैकी फार कमी ठिकाणी अशी फलके दिसून येतात.

स्वत:हून सायलेन्स झोनच्या नियमांचे पालन केल्या जात नाही तोपर्यंत त्यावर अंकुश लावणे अवघड होते. स्वयंशिस्त या गोष्टीवर रामबाण उपाय आहे. कारण पोलिसांच्याही कारवाईला मर्यादा आहेत.
- रणजित देसाई, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा, अमरावती.

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णास बरे होण्यासाठी औषधोपचारासोबतच शांततेचीही मोठी गरज असते. सायलेन्स झोनसंदर्भात नियम पाळणे गरजेचे आहे. ध्वनिक्षेपकाचा, वाहनांच्या ककर्ष हॉर्नचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी दंडाची तरतूद मोठ्या स्वरूपात असावी.
- डॉ. शामसुंदर निकम, जिल्हाशल्य चिकित्सक, अमरावती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com