लाखो भक्तांची राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली

 गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करताना गुरुदेवभक्त.
गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करताना गुरुदेवभक्त.

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) : खंजिरी भजनांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे, विश्‍वबंधुत्वाचा संदेश देणारे युगपुरुष वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आपल्या गुरुमाउलीला "मौन श्रद्धांजली' अर्पण करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून लाखोंच्या संख्येने आलेल्या गुरुदेवभक्त व साधकांनी शनिवारी (ता. 19) साश्रुनयनांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अतिरेकी हल्ल्यात भारतीय लष्करातील शहीद झालेल्या जवानांनासुद्धा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्‍विन वद्य पंचमीला इंग्रजी पंचांगानुसार शुक्रवार 19 ऑक्‍टोबर 1968 रोजी सायंकाळी 4.58 मिनिटांनी झाले होते. तेव्हापासून राष्ट्रसंतांना त्यांच्या विचारांचे सर्व धर्म, पंथांतील भक्त व साधक, या दिवशी श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण करतात. गेल्या 50 वर्षांपासून श्रद्धांजलीचा सोहळा अविरतपणे सुरू आहे.
टाळ-मृदंगांसह गजर करीत भगवी टोपी परिधान करून सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या गुरुकुंजात गुरुदेवभक्त दाखल झाले. राष्ट्रसंतांच्या भव्यदिव्य विश्‍वव्यापक कार्याची महती शब्द व सुरांच्या माध्यमातून महेश तिवारी यांनी उपस्थित जनसमुदायाला या वेळी करून दिली.
मौन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला दुपारी 3.30 वाजता "गुरुदेव हमारा प्यारा, है जीवन का उजियारा।' या प्रार्थनागीताने सुरुवात करण्यात आली. जवळ-जवळ तीन तास लाखोंचा जनसमुदाय राष्ट्रसंतांचा विश्‍वात्मक विचार व त्यांच्या कार्याचा त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा त्यांच्या दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसलेला होता. ठीक 4.58 मिनिटांनी शिस्तबद्धरीतीने सर्वगुरुदेव भक्तांनी, साधकांनी महासमाधिस्थळाच्या दिशेने दोन्ही हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात "मै मानव जीवन की सुसाधना का कर्मयोग हूं। मै इस संसार को विश्‍वशांती का मार्गदाता हूं।' हे भजन सादर करण्यात आले.
"चलाना हमें नाम गुरु का चलाना।' व "राष्ट्रसंता जगद्‌गुरू कृपावंता' ही सामूहिक आरती करण्यात आली. तसेच हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्‍चन, पारशी या सर्व धर्मांच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरूंकडून करण्यात येऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या वेळी देण्यात आला.
मौन श्रद्धांजली कार्यक्रमाच्या वेळेस काही क्षणांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मौन श्रद्धांजलीचा नयनरम्य सोहळा पार पडला. या वेळी योगगुरू रामदेवबाबा, डॉ. कमलेश पटेल, अंबादास महाराज, मधुकर खोडे महाराज, डॉ. उद्धवराव गाडेकर, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, यशोमती ठाकूर, राजेश वानखडे, शरद तसरे आदी उपस्थित होते. श्रद्धांजली कार्यक्रमाचे नियोजन अध्यात्म विभागाचे प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले. गोपाल सालोडकर, किशोर अगडे, शीतल मांडवगडे, नीलेश इंगळे, रवी खंडारे, हरीश लांडगे, रामेश्‍वर काळे, प्रशांत ठाकरे, स्वप्नील बोबडे, यश यावले, शीतल बुरघाटे, जया सोनारे, शीतल तायडे, रश्‍मी भाटी, धनश्री खारोडे, स्वप्नील सरकटे, अरविंद गेडाम, प्रवीण काळे, घनश्‍याम काटकर यांनी विविध वाद्यांची व गायनाची साथसंगत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com