
Sindkhedraja News : मातृतीर्थच्या वंशजाकडून छत्रपती संभाजी महाराज जयंती दिल्लीत साजरी
सिंदखेडराजा - छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती, दिल्ली यांच्यावतीने मातृतीर्थचे राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विचारमंचावर राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव व छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती अध्यक्षकिशोर चव्हाण, विलास पांगारकर, विजय काकडे, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के, प्रदीप साळुंखे मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे राजे शिवाजीराव जाधव यांनी इतिहास कालीन अनेक पैलूंचा उलगडा करताना कुटुंबातील पहिल्या मुलीच्या जन्मानंतर हत्तीवरुन मिरवणुक काढून साखर वाटणारे हे जगातले पहिले राजे आहे. माँ जिजाऊ यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा पाढा वाचताना विदर्भ-मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्र-कोकण व दक्षिण भारत हे कार्य क्षेत्र कसे होते याबद्दल सांगीतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष बोलताना विलास पांगारकर म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वराज्य निर्मितीचा अखंड तळपणारा दीपक देशभरातील शालेय स्तरावर पोहचावा म्हणून केंद्र शासनातर्फे सुध्दा विशेष उपक्रम राबविला गेला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्राख्यात वक्ते प्रा. प्रदीप साळुंके यांनी अत्यंत मृदु व सरळ भाषेत छत्रपती संभाजी महाराज यांची जीवन शैलीचे विविध प्रसंग मांडले..छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधी हार मानली नाही तोच संदेश त्यांच्या मावळ्यांनी घ्यावा असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
विजय काकडे, मराठा रामनारायण, कमलेश पाटील, मराठा, इंजि.तानाजी हुस्सेकर, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के यांची ही प्रबोधनपर भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी केले. यावेळी राष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची मागणी केली. यासह मराठा टुरिझम नावाने शिवरायांचा भौगोलिक इतिहास जोडणारा प्रकल्प केन्द्र शासनाने हाती घ्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. सुत्र संचालन कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी केले, आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रा.डॉ.राजाराम दमगीर यांनी केले.