धक्कादायक ! नागपूर शहरात एकच मलेरियाग्रस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

नागपूर ः स्क्रब टायफस, स्वाइन फ्लूचा संसर्गाचा प्रकोप सुरू असताना डेंगीचा उद्रेक पसरला आहे. डेंगीच्या साथीने हिवतापाने पूर्व विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये डोकं वर काढलं आहे. मात्र, नागपूर शहरात एकच मलेरियाग्रस्त असल्याचे आढळून आले. ही आकडेवारी फसवी असल्याची जोरदार चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे.

नागपूर ः स्क्रब टायफस, स्वाइन फ्लूचा संसर्गाचा प्रकोप सुरू असताना डेंगीचा उद्रेक पसरला आहे. डेंगीच्या साथीने हिवतापाने पूर्व विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये डोकं वर काढलं आहे. मात्र, नागपूर शहरात एकच मलेरियाग्रस्त असल्याचे आढळून आले. ही आकडेवारी फसवी असल्याची जोरदार चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे.

पूर्व विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांत हिवतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जानेवारी ते सप्टेंबर 2019 या कालावधीत हिवतापाचे (मलेरिया) 1 हजार 682 रुग्ण आढळले आहेत. यातील 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मागील चार महिन्यांत हिवतापाचे 3 मृत्यू नोंदविले गेल्याची माहिती आरोग्य विभागाच्या पुणे येथील कार्यालयात नोंदविली आहे. जानेवारी ते आजपर्यंत मृतांचा आकडा पाचवर पोहोचला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून हिवताप नियंत्रण तसेच उपचार यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. त्या तुलनेत हिवतापावर नियंत्रण येत नाही.

महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येतात. या विभागांवर साथीच्या आजारांच्या जनजागृती आणि नियंत्रणाची जबाबदारी असते. आर्थिक तरतूदही केली जाते. मलेरिया अर्थात हिवतापाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद गडचिरोलीत आहे. 1 हजार 409 रुग्ण आढळले असून एक जण दगावला आहे. गोंदिया जिल्ह्यात 216 रुग्ण आढळले. तर मृत्यूचा आकडा मात्र येथे फुगला आहे. ऑगस्ट- 2019मध्ये उपचारादरम्यान 3 जण गोंदियात दगावले. तर भंडारा जिल्ह्यात रुग्ण आढळले असले, तरी एकही मृत्यू झाला नाही. चंद्रपूरमध्ये रुग्ण आढळले असले तरी एकही मृत्यू नाही. नागपूर ग्रामीणमध्ये रुग्ण आढळले असून एक मृत्यू नोंदवण्यात आला.

नागपूर शहरात नाही हिवतापाचा मृत्यू
विशेष असे की, नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागात मागील 3 वर्षांत हिवतापाने एकही मृत्यू झाला नाही, अशी नोंद आरोग्य विभागात आहे. विशेष असे की, उपराजधानी डासांचे साम्राज्य पसरले आहे. मात्र, येथे एकही मृत्यू झाला नाही. हा दावा नोंदीवरून केला गेला आहे. एकही हिवतापाच्या बळीची नोंद महापालिकेत नसल्याने मनपातील आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे. नागपूर शहरात केवळ एका रुग्णाची नोंद असून मागील तीन वर्षांत एकही मृत्यू नसल्याचे आरोग्य विभागातील पुण्यात कार्यरत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर माहिती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A single malaria sufferer in Nagpur city