आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या..! 

आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या..! 

नागपूर - शहरातील सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे अलीकडच्या काळात संक्रमण अवस्थेतून जात आहेत. या चित्रपटगृहांचा महिन्याचा सरासरी खर्च चार लाख असून उत्पन्न मात्र दोन लाखांपेक्षा जास्त नाही. यामुळे "आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या' अशी अवस्था चित्रपटगृहांची झाली आहे. 

मुंबई-पुण्यात हिंदी चित्रपटांनी कमाई केली नाही तरी दर्जेदार मराठी चित्रपटांमधून चित्रपटगृहांना समतोल साधता येतो. नागपूरमध्ये तशी परिस्थिती नाही. इथे "सूपरडुपर', "ब्लॉकबस्टर' असे लेबल आणि खूप गाजावाजा झाला तरच प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे वळतो. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची भूमिका असलेला "102 नॉट आउट' हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट "सिंगल स्क्रीन'वर आठवडाभरात फक्त तीन दिवस कमाई करू शकला. शहराच्या मध्यभागी असलेल्या एका चित्रपटगृहात टायगर श्रॉफच्या "बागी-2'च्या एका शो चे सर्वाधिक कलेक्‍शन दीड हजार होते. 

चित्रपट कसाही असो एका चित्रपटगृहाला दर महिन्याला साधारणतः चार लाख रुपये खर्च ठरलेलाच आहे. वर्षभरात दोन किंवा तीन चित्रपट सोडले तर महिन्याला दोन लाखांची आवक देखील ही "सिंगल स्क्रीन' सिनेमागृहे करू शकत नाहीत. यामध्ये जागेचे भाडे, कुलिंग, कर्मचाऱ्यांचे पगार, मेन्टनन्स, सुरक्षा यंत्रणा आदींचा समावेश आहे. पूर्वी या चित्रपटगृहांना वितरकाकडून आठवड्याचे विशिष्ट भाडे मिळायचे, आज तिकिटांच्या विक्रीमध्ये शेअर असल्याने तोट्याची पूर्ण खात्री आहे. 

मल्टिप्लेक्‍सला शॉपिंगचा आधार 
टचस्क्रीनवर सिनेमा उपलब्ध झाल्यामुळे मल्टिप्लेक्‍सलाही मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावे लागत आहे. पण, देशभरात विस्तार असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या शहरातून नुकसान भरून निघते. शिवाय शॉपिंग हा त्यांचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे सिनेमा चालला किंवा नाही, त्यांना फरक पडत नाही. 

"सिंगल स्क्रीन'चा लेखाजोखा 

4 लाख---2.15 लाख 
खर्च---उत्पन्न 
(महिन्याचा खर्च व उत्पन्न, आलेख ः अप्रमाणित) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com