पापाचा घडा फुटला! मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांचा कारावास

file photo
file photo

अमरावती  : महाविद्यालयीन मुलीस लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या आरोपीला येथील जिल्हा न्यायालयाने मंगळवारी (ता. 15) दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश एस. ए. सिन्हा (वय 8) यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला. ज्ञानेश्‍वर ऊर्फ दल्लू महादेव कावडे (वय 25, रा. मिर्ची प्लॉट, वरुड), असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. दोषारोपपत्रानुसार 2015 मधील ही घटना आहे. अकरावीची संबंधित पीडित मुलगी महाविद्यालयात जात असताना परिसरात राहणारा ज्ञानेश्‍वर हा तिचा पाठलाग करीत होता. आधीपासूनच परिचित असल्याने उभयतांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. त्याने मुलीला लग्नाचे आमिष दिले. दरम्यान ज्ञानेश्‍वर याने मुन्ना शेट्टी यावलकर (रा. वाडी, वरुड) यांच्याकडे खोली भाड्याने घेऊन त्या ठिकाणी मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तेथून त्याने तिला स्वतःच्या घरी नेऊन स्वतंत्र खोलीत ठेवले. तेथून त्याने पुन्हा मुलताई मार्गावरील ढाब्यानजीक भगत यांच्याकडे रूम भाड्याने घेऊन त्या ठिकाणी मुलीस ठेवले. तिथे तिला मारहाण सुरू केली. मुलीच्या आईने शोध घेऊन तिला घरी आणले, तेव्हा घडलेला प्रकार तिने सांगितला. याबाबतची तक्रार वरुड ठाण्यात 27 ऑक्‍टोबर 2015 ला नोंदविण्यात आली. वैद्यकीय तपासणीत संबंधित मुलगी 14 आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. त्याआधारे अत्याचार तसेच बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्यान्वये ज्ञानेश्‍वरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. मुलीचा गर्भपात करून गर्भाची डीएनए चाचणी करण्यात आली. संबंधित गर्भधारणा ज्ञानेश्‍वरपासूनच झाल्याचे त्यातही स्पष्ट झाले.
जिल्हा न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांच्या न्यायासनासमक्ष या प्रकरणाची सुनावणी झाली. सहायक सरकारी वकील मिलिंद जोशी यांनी पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविली. सरकारी व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी ज्ञानेश्‍वरला दोषी ठरवत 10 वर्षे कारावास, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com