सर, आम्ही चुकलो, आम्हाला परत घ्या! त्यांनी मागितली माफी अन्‌ गवसले हे यश....

Three students
Three students

गडचिरोली : जिल्ह्यातील नामांकित प्लॅटिनम ज्युबिली स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अतिशय गुणवंत विद्यार्थिनी. तिघीही सख्ख्या मैत्रीणी आणि दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून पहिले तीन क्रमांक मिळवणाऱ्या. पण, बारावीत जाताच त्यांना वाटले की, आपण महाविद्यालयात नाममात्र प्रवेश घेऊन घरीच अभ्यास करावा. त्यासाठी त्यांनी एका ठिकाणी प्रवेशसुद्धा घेतला. पण, तेथील वातावरण, मार्गदर्शनाचा  अनुभव येताच पुन्हा आपल्याच महाविद्यालयात परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे त्या तिघींनाही यशाची वाट गवसली असून तिघींनी 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. 

यंदाच्या बारावीच्या निकालात प्लॅटिनम ज्युबिली स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाची मार्टीना हेमानी हिने 92. 76 टक्‍के, मिनाक्षी परतानी हिने 92. 31 व श्रुती दूधबावरे हिने 90. 31 टक्‍के असे घवघवीत गुण प्राप्त केले. याच महाविद्यालयातील भावेश अंबोरकर याने 90 टक्‍के गुण मिळवले. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेत मार्टीना हेमानी जिल्ह्यातून प्रथम आली होती. श्रुती दूधबावरे द्वितीय, तर मिनाक्षी परतानी हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला होता. पण, यशाचा हा दर्जा बारावीतही कायम राहणार, की नाही, याबद्दल त्या साशंक होत्या. त्यामुळे त्यांनी विचार केला की, महाविद्यालयात दररोज जाऊन अभ्यास करण्याऐवजी एखाद्या दुसऱ्या महाविद्यालयात जुजबी प्रवेश घेऊ आणि घरातच राहून अभ्यास करू. 

ठरल्याप्रमाणे त्यांनी तो प्रयोगही केला. पण, काही दिवसांतच "गुरूविना विद्या नाही' ही म्हण त्यांच्या प्रत्ययास आली. जिथे प्रवेश घेतला तिथे अतिशय मुक्त वातावरण होते. तुम्ही आले काय किंवा नाही आले काय, अभ्यास किंवा गृहपाठ केला काय किंवा नाही केला काय, कुणाला काहीच फरक पडत नव्हता. प्लॅटिनममध्ये आतापर्यंत शिस्तीत वाढलेल्या या मुलींना पुन्हा आपल्याच शाळेची आठवण येऊन लागली. त्यांनी प्राचार्य अमलानी यांची भेट घेऊन आपली चूक कबूल केली. त्यांनीही मोठ्या मनाने आणि वडीलकीच्या नात्याने त्यांना चांगले यश मिळविण्यासाठी महाविद्यालयाचे वातावरण, तेथील शिस्त, शिक्षकांचे मार्गदर्शन, तळमळ कशी महत्त्वाची आहे, हे समजावून सांगितले 

आणि अखेर या गुणवंत मुलींची "घर वापसी' झाली अर्थात जुन्याच महाविद्यालयात आल्या. त्यांनी आपल्या अभ्यासासाठी अधिकाधिक वेळ महाविद्यालयातच घालवला. मार्टीना तर सकाळपासून सायंकाळपर्यंत इथेच अभ्यास करत असायची. त्यामुळे या काळात हेच आपले दुसरे घर झाल्याचे ती गमतीने म्हणाली. खरेतर शाळेलाच जुळून असलेले हे कनिष्ठ महाविद्यालय असल्याने नेहमीच्या महाविद्यालयाप्रमाणे त्यांना वातावरण मिळाले नाही. पण, या शिस्तीच्या शालेय वातावरणाचाच त्यांना लाभ मिळाला आणि हे यश मिळवता. याबद्दल त्यांनी प्लॅटिनमचे प्रशासन व सर्व गुरुजनांचे आभार मानले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव अझीझ उर्फ बंटीभैय्या नाथानी, प्राचार्य रहिम अमलानी, उपप्राचार्य सोहम मंगर, समन्वयक प्रफुल्ल पराते व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. 

वैद्यकीय, अभियांत्रिकीत जाणार.... 

प्लॅटिनम ज्युबिली कनिष्ठ महाविद्यालयाच्या या चार गुणवंत विद्यार्थ्यांपैकी दोघांना वैद्यकीय क्षेत्राची आवड आहे, तर दोघांना अभियांत्रिकी क्षेत्राची. मार्टीना हेमानीला वैद्यकीय शिक्षण घेऊन हृदयरोगतज्ज्ञ व्हायचे आहे, तर मिनाक्षीला याच क्षेत्रातील स्त्रीरोगतज्ज्ञ व्हायचे आहे. श्रुती दूधबावरेचा आदर्श दिवंगत अंतरीक्षवीर कल्पना चावला असून तिला अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून अंतराळ संशोधन क्षेत्रात कार्य करायचे आहे. भावेश अंबोरकरला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com