सुनील कुळमेथेच्या मृत्यूने सिरोंचा दलम संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

सिरोंचा तालुक्‍यातील व्यंकटापूर (बामणी) नजीकच्या सिरकोंडा जंगलात मंगळवारी (ता. 3) पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. यात सिरोंचा नक्षल दलम प्रमुख सुनील ऊर्फ विलास मारा कुळमेथे याचा खात्मा झाल्याने तालुक्‍यातील दलम संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कुळमेथेवर 30 लाखांचे बक्षीस होते.

गडचिरोली : सिरोंचा तालुक्‍यातील व्यंकटापूर (बामणी) नजीकच्या सिरकोंडा जंगलात मंगळवारी (ता. 3) पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. यात सिरोंचा नक्षल दलम प्रमुख सुनील ऊर्फ विलास मारा कुळमेथे याचा खात्मा झाल्याने तालुक्‍यातील दलम संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कुळमेथेवर 30 लाखांचे बक्षीस होते.
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्‍यातूनच नक्षल संघटनेचा उदय झाला होता. सुरुवातीच्या काळात या भागात माओवाद्यांनी मोठ्या हिंसक कारवाया केल्या. सिरकोंडा परिसरात नक्षल सदस्य असल्याची माहिती मिळाल्यावरून सी-60 पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. पहाडालगतच्या एका धबधब्याजवळ सिरोंचा नक्षल दलमचे सदस्य विश्रांतीसाठी थांबले असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच माओवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत दलम कमांडसह तीन माओवादी ठार झाले. या घटनेचा नक्षल संघटनेला जबर धक्का बसला आहे.
सिरोंचा तालुक्‍यातील गोविंदपूर गावात 2013 मध्ये पोलिस-नक्षल चकमकीत तब्बल 11 माओवादी ठार झाले होते. गावात बैठक सुरू असताना पोलिसांनी घेराव घालून माओवाद्यांना कंठस्नान घातले. या घटनेनंतर दलम कमांडर सुनील कुळमेथे
याची बदली अबुझमाड परिसरात झाली होती. मात्र अहेरी उपविभागात नक्षल कारवाया थंडावल्याचे लक्षात येताच गेल्या वर्षी पुन्हा सुनीलकडे सिरोंचा दलमची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांत या भागात नक्षल कारवायांना सुरुवात झाल्याने पोलिसांनी सीमा भागात नक्षल विरोधी अभियान तीव्र केले.
सिरोंचा तालुक्‍यातील झिंगानूर परिसरात घनदाट जंगल असल्याने माओवाद्यांचा सुरक्षेसाठी या भागात वावर सुरू होता. रोमपल्ली, झिंगानूर तसेच सिरकोंडा या मार्गे छत्तीसगड तसेच तेलंगणा राज्यात ये-जा करण्यासाठी सोयीचे होत असल्याने सिरोंचा दलमचे सदस्य नेहमीच येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नक्षल विरोधी पथकाच्या जवानांनी झिगानूर जंगल परिसरात आपला डेरा टाकला होता. सिरकोंडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत तीन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात सी-60 पथकाला
यश आले.
अटकेतील माओवाद्याची ओळख पटली
धानोरा तालुक्‍यातील मुरूमगाव येथील आठवडी बाजारात मंगळवारी (ता. 3) पोलिसांनी अटक केलेल्या माओवाद्याची ओळख पटली आहे. त्याच्यावर दोन लाख रुपयाचे बक्षीस होते. गर्दीचा फायदा घेऊन पोलिसावर हल्ला करण्याच्या हेतूने आलेले अन्य तीन नक्षलवादी फरार झाले. हरीश ऊर्फ संतोष विठ्ठल पोटावी (रा. मरकेगाव) असे अटक केलेल्या माओवाद्याचे नाव आहे. तो टिप्पागड नक्षल दलमचा सदस्य होता. 2011 मध्ये दलममध्ये भरती झालेला हरीश सुरुवातीला कसनसूर दलममध्ये कार्यरत होता. त्यानंतर त्याची बढती प्लाटून दलम क्रमांक तीनमध्ये झाली होती. एटापल्ली तालुक्‍यात विविध घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. पोलिसांना टार्गेट करण्याच्या हेतूने पोटावी आपल्या तीन साथीदारासह काल मुरूमगाव येथील बाजारात आला होता.

Web Title: Sironcha dalam news

टॅग्स