गोंडवाना विद्यापीठ जमीन खरेदीतील घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

मुंबई : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासाठी जमीन खरेदीप्रकरणी झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे व या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले. यासंदर्भातील प्रश्‍न अनिल सोले यांनी विचारला होता.

मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात दिलेल्या माहितीनुसार गोंडवाना विद्यापीठासाठी अडपल्ली (ता. जि. गडचिरोली) येथील 78.17 हेक्‍टर जमीन खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने एकूण रुपये 92 कोटी 18 लाख 13 हजार 823 इतका निधी मंजूर केला होता. विद्यापीठाने 13 कोटी 38 लाख 09 हजार 926 एवढा निधी खर्च करून 14.15 हेक्‍टर जमीन खरेदी केली. 15 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या सिनेट बैठकीत डॉ. प्रमोद शंभरकर यांनी विद्यापीठासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीच्या दरात तफावत असल्याचा आक्षेप घेतला होता. ही तफावत तपासण्यासाठी सिनेट सदस्य होळी यांच्या अध्यक्षतेखाली समितीही गठित झाली. दरम्यान, सहाय्यक जिल्हाधिकारी व विशेष भूसंपादन अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना या जागेचे फेरमूल्यांकन करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्या अहवालानुसार पूर्वीच्या मूल्यांकनात व फेरमूल्यांकनात तफावत असल्याचे आढळून आले, अशी माहिती मंत्र्यांनी सभागृहात दिली.
या गैरप्रकारप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार का? तसेच एसआयटी नेमणार का? असा प्रश्‍न सोले यांनी विचारला होता. विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, ना. गो. गाणार यांनीदेखील फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावर चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याची व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन वायकर यांनी सभागृहात दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SIT on gondwana university land purchase scam