सोळाव्या वर्षी स्वातंत्र्यासाठी भोगला कारावास 

सतीश दहाट
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

कामठी (जि.नागपूर) : देशाला स्वातंत्र्य मिळून 71 वर्षे झाली आहेत. नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कामठीच्या डॉ. रतनचंद जैन (पहाडी) यांना क्रांतिदिनी विशेष पुरस्काराने सन्मानित केले. शहरात पोहोचल्यावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना सहा वेळा पोलिसांनी अटक केली. त्यांना नेताजींचे सान्निध्यही लाभले. 

कामठी (जि.नागपूर) : देशाला स्वातंत्र्य मिळून 71 वर्षे झाली आहेत. नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कामठीच्या डॉ. रतनचंद जैन (पहाडी) यांना क्रांतिदिनी विशेष पुरस्काराने सन्मानित केले. शहरात पोहोचल्यावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना सहा वेळा पोलिसांनी अटक केली. त्यांना नेताजींचे सान्निध्यही लाभले. 
देशाच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाचा अगदी जवळून अनुभव घेतलेल्या डॉ. रतनचंद जैन यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी ताज्या केल्या. डॉ. रतनचंद म्हणाले, 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी इंग्रजांना "भारत छोडो'चा नारा दिला होता. विद्यार्थ्यांत देशभक्तीची स्वयंस्फूर्त भावना निर्माण झाली होती. इंग्रज सरकारविरोधात "रणभेरी' या पत्रिकेचे प्रकाशन केले जात होते. डॉ. पहाडी यांच्याकडे वाराणसीच्या बाजारात "रणभेरी'च्या वाटपाची जबाबदारी देण्यात आली होती. पत्रिकेचे वाटप करीत असताना सिव्हिल ड्रेसमध्ये फिरणाऱ्या इन्स्पेक्‍टर भवानी यांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर खटला चालला. क्रांतिकारी सचिंद्रनाथ सान्याल व त्यांचे इतर सहक्रांतिकाऱ्यांसोबतच शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रो. गेरोला, जयचंद विद्यालंकार, अय्यर या क्रांतिकारकांची त्यांना मदत मिळत होती. डॉ. पहाडी यांनी अनुभव कथन करताना सांगितले की, क्रांतिकाऱ्यांना ग्वालियरमधून पिस्तुली वाराणशीला पोहोचविण्यात येत होत्या. सहा पिस्तुली आढल्याने त्यांचे साथीदार कर्णधार बालचंद जैन यांना अटक केली. रतनालाल यांनी पाच पिस्तुली गंगेत प्रवाहित केल्या, तर एक पिस्तूल वाराणशीच्या छेदीलाल मंदिरात लपवून ठेवली. या प्रकरणी त्यांना अटक केली व सहा महिन्यांचा सश्रम कारावास सुनावला. कारागृहात रवाणगी झाली त्यावेळी ते केवळ 16 वर्षांचे होते. याच कारागृहात डॉ. संपूर्णानंद, स्वामी स्वरूपानंद यांनासुद्धा ठेवण्यात आले होते. एका रात्री ओढण्यासाठी ब्लॅंकेट न मिळाल्याने दिव्यांना फोडून कारागृहाला आग लावण्याचा प्रयत्न केला होता.  कारावासादरम्यान माजी खासदार राजाराम शास्त्री, सीताराम मैत्रेय, आंध्राचे अय्यर हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. विद्यार्थी असताना वाराणशीच्या बंगाली टोलाक्षेत्रात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सान्निध्य रतनचंद यांना लाभले. त्यांच्यासोबत कारावासात राहणाऱ्या काही क्रांतिकाऱ्यांना आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षासुद्धा सुनावण्यात आली होती. 
कामठीच्या स्वातंत्र्यसेनानींची आठवण 
स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांमध्ये कामठी शहर व कामठी तालुक्‍यातील एकूण 26 लोकांचा समावेश होता. यात भय्याजी खराबे, मगनलाल बांगडी, श्‍यामराव हरबाजी अतकरी, बुद्धगीर हिरागीर गोसावी, अमृत आत्माराम खराबे, गुलाब मंगलशा, लक्ष्मण सीताराम वाळके, जनाबाई रामचंद्र भगत, मंजुळाबाई बुधाजी गोसावी, भुया दयाराम खराबे, नामदेव तुकाराम शेलाकार, रामाजी वाळके, भिकाजी जागो फटिंग, रामचंद्रगीर किसन गोसावी सर्व राहणार वडोदा, कवडू सुकाजी आष्टनकर, मोहम्मद रफी शेख इदू, प्रभाकर राजाराम खाखडे, सावशील मणिलाल खरडकर, मुन्नालाल भुरमल तिवारी, सदाशिव व्यंकटेश वैद्य, श्रीराम रामजीवन शर्मा, विठ्ठलराव संगेवार, प्रभाकर हांडा, कुंजीलाल शिंदे, भारतलाल शिंदे, डॉ. रतनचंद पहाडी (सर्व रा. कामठी) यांचा समावेश होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixteen years of imprisonment for freedom