खरेदी केंद्रांनी चालविली शेतकऱ्यांची थट्टा; एक टक्काही तूर खरेदी नाही!

अनुप ताले
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी एक टक्काही शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आलेली नाही. मंगळवारपर्यंत (ता.18) जिल्हाभरातून 16 हजार 148 शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली मात्र, त्यांचेपैकी केवळ 117 शेतकऱ्यांकडून 1662 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.

अकोला : हमीभाव तूर खरेदी केंद्रांनी यंदाही शेतकऱ्यांची थट्टा चालविली असून, आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी एक टक्काही शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आलेली नाही. मंगळवारपर्यंत (ता.18) जिल्हाभरातून 16 हजार 148 शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली मात्र, त्यांचेपैकी केवळ 117 शेतकऱ्यांकडून 1662 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांद्वारे 30 टक्क्यांपैक्षा अधिक तूर खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापाऱ्यांना, त्यांनी ठरविलेल्या दरात तूर विकून हात मोकळे करावे लागत आहेत. या धोरणामुळे शेतकऱ्यांची दरवर्षी व्यापाऱ्यांकडून लुट होत असून, मोठे नुकसान सोसावे लागत आहे. यंदा मात्र शेतकऱ्यांना न्याय दिला जाऊन, शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीसाठी योग्य धोरण राबविले जाईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

परंतु, यावर्षी सुद्धा जिल्ह्यातील सर्व हमीभाव केंद्रांद्वारे तूर उत्पादकांची थट्टा चालविली जात असून, आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी एक टक्काही शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी करण्यात आलेली नाही. हमीभाव केंद्रांच्या या संथ शेतमाल खरेदी प्रक्रियेमुळे व कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे यंदाही तूर उत्पादकांच्या पदरी निराशाच पडणार का, असा प्रश्न उपस्थित करुन जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांनी केली आहे.

महत्त्वाची बातमी - अबब..नऊ क्विंटलचा ‘महारोठ’; वाचा कुठे आणि कसा बनवला

सातपैकी सहा केंद्रावर खरेदी
जिल्ह्यात जिल्हा पणन महासंघ व व्हीसीएमएस अंतर्गत किमान आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये ‘जिल्हा पणन महासंघ’ अंतर्गत तेल्हारा, बाळापूर (वाडेगाव), पातूर, पारस या चार ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू केले असून, त्यापैकी तेल्हारा केंद्रावर अद्यापपर्यंत प्रत्यक्ष तूर खरेदी सुरू झालेली नाही. व्हीसीएमएस अंतर्गत अकोला, अकोट, मूर्तिजापूर या तीन ठिकाणी केंद्रांवर तूर खरेदी सुरू आहे.

जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवरील 18 फेब्रुवारीपर्यंतची नोंदणी व तूर खरेदी
हमीभाव केंद्र      ऑनलाइन नोंदणी           प्रत्यक्ष खरेदी
                                                  शेतकरी संख्या    तूर (क्विंटल)
तेल्हारा                  1850                   ------                 ------
वाडेगाव                 1869                    02                  13.00
पातूर                     1144                    06                  23.50
पारस                     2640                   36                420.00
अकोला                  3666                    65             1102.50
अकोट                    3257                    01                10.25
मूर्तिजापूर               1722                    07              103.00
एकूण                   16148                  117            1672.25


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slow procurement process at Government tur Centers