Video : तुमच्या चिमुकल्याचं डोकं दुखतेय, चिडचिड वाढली, भूक मंदावली? हे आहे कारण...

रूपेश खैरी
शनिवार, 23 मे 2020

बालरुग्णालयात डोकेदुखी, भूक मंदावणे, चिडचिड वाढणे, जास्त भूक लागणे, रात्रीला झोप न येणे यासरख्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे पुढे आले आहे. यावर औषधोपचार घेऊन पुन्हा मुले याच मोबाईल व टॅबच्या आहारी जात आहेत. एका आजारापासून घरी राहण्यातून दुसऱ्या आरोग्याची समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची नवी जबाबदारी पालकांवर आली आहे. 

वर्धा : कोरोनामुळे लॉकडाउन सुरू आले आणि शाळा बंद झाल्या. बाहेर खेळणेही बंद झाल्याने चिमुकले घरातच बंदिस्त झाले आहेत. यामुळे वेळ घालविण्यासाठी आणि ऑनलाइन अभ्यासाच्या नावावर मोबाईलचा वापर वाढला आहे. परिणामी त्यांच्यात डोकेदुखीसह चिडचिड वाढणे, भूक मंदावणे, जास्त भूक लागणे यासारखे आजार वाढल्याचे पुढे आले आहेत. 

मुले घरी असल्याने सध्या पालकांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी आपली जबाबदारी योग्य पार पाडली तर असे आजार होणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाढत असलेल्या या आजारामुळे मुलांना रात्री झोप लागत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावर औषधोपचार आहे. परंतु, त्यापेक्षा पालकांनी सजग राहून उपाययोजना आखल्या तर बरे, असे बालरोगतज्ज्ञ सांगतात. 

हेही वाचा - अल्पवयीन मुलगी सुट्ट्यांमध्ये मामाकडे राहायला आली अन् गर्भवती झाली; मग कुटुंबीयांनी पुण्यात केली प्रसूती

उन्हाळ्याच्या दिवसात साधारणत: शाळांना सुट्या असतातच. सध्या तसा सुट्यांचाच काळ सुरू आहे. या सुट्यांच्या काळात मुलांना मामाच्या गावी किंवा कुठे फिरण्यासाठी पालक घेऊन जातात. परंतु, सध्या असलेल्या लॉकडाउनमुळे ते शक्‍य नाही. यामुळे दिवसभर घरी असलेल्या मुलांकडून वेळ घालविण्यासाठी मोबाईल, टॅबचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. यात ऑनलाइन वाचन, अभ्यास, गेम्स आदी दिवसभर सुरू असते. पालकही मुले शांत असतात म्हणून याकडे विशेष लक्ष देत नाही. दिवसभर मुले मोबाईलमध्येच गुंतले आहेत. 

या प्रकाराला आता दोन महिन्यांचा काळ होत असल्याने त्याचे विपरित परिणाम पुढे येत आहेत. बालरुग्णालयात डोकेदुखी, भूक मंदावणे, चिडचिड वाढणे, जास्त भूक लागणे, रात्रीला झोप न येणे यासरख्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे पुढे आले आहे. यावर औषधोपचार घेऊन पुन्हा मुले याच मोबाईल व टॅबच्या आहारी जात आहेत. एका आजारापासून घरी राहण्यातून दुसऱ्या आरोग्याची समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची नवी जबाबदारी पालकांवर आली आहे.

अधिक माहितीसाठी - होम क्वॉरान्टाईनचा शिक्‍का असलेल्या व्यक्‍तीचा रस्त्यावर तडफडून मृत्यू

तज्ज्ञ म्हणतात

मुलांच्या स्क्रिनटाइमबाबत जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच काही निर्देश दिले आहेत. यात शून्य ते दोन वर्षांच्या काळातील मुलांना स्क्रिनपासून दूर ठेवावे. दोन ते चार वर्ष वयाच्या मुलांना स्क्रीन देताना त्याला इंटरनेटची सुविधा नसावी. तर या वयाच्या वर असणाऱ्या चिमुकल्यांना स्क्रीन देताना त्यावर पालकांचे लक्ष असावे. शिवाय त्याचा वेळ कमीत कमी असणे अणिवार्य आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास मुलांत असे विविध आजार येण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. 

मुलांना गच्चीवर, अंगणात खेळण्यास सांगा

सध्या सुट्या आहेत. लॉकडाउनमुळे बाहेर मैदानात वा कुठे बगिचात जाणे शक्‍य नाही. यामुळे मुलांना घराच्या छतावर, आपल्या अंगणात खेळण्यास सांगा. जेणेकरून मुले मोबाईलपासून दूर होतील. घरी बसून आलेला कंटाळा यातून दूर होईल. सध्या पालकही घरीच आहेत. अशावेळी त्यांनी मुलांसोबत खेळल्यास त्यांनाही बरे वाटेल आणि त्यांच्या मानसिक विकासासाठी ते लाभाचे ठरेल.

क्लिक करा - अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना मृत महिलेने केली हालचाल, अन्‌ पुढे...

चिमुकल्यांत नवेच आजार 
सध्या रुग्णालयात येत असलेल्या चिमुकल्यांत नवेच आजार दिसून आले आहेत. यात डोकेदुखी, चक्कर येणे, चिडचिड वाढणे, भूक वाढणे-मंदावणे आदी प्रकाराच्या आजारांचा समावेश आहे. एका मुलात हे आजार नाही तर प्रत्येक रुग्णच या आजाराने ग्रासल्याचे दिसत आहे. या आजारांच्या कारणांचा विचार केल्यास मुलांच्या स्क्रीन वापरात होत असलेली वाढ हे एक कारण असल्याचे पुढे आले आहे. यावर औषधोपचार आहे. पण, पालकांनीही मुलांना स्क्रिनपासून शक्‍य तेवढे दूर ठेवणे अनिवार्य झाले आहे. अन्यथा त्याच दुष्परिणाम मुलांवर दिसतील. 
- डॉ. सचिन पावडे, 
बालरोग तज्ज्ञ, वर्धा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: small child is suffering due to mobile