‘स्मार्ट सिटी’ अंमलबजावणीत नागपूर अव्वलस्थानी कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

नागपूर - दुसऱ्या टप्प्यात निवड होऊनही ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प अंमलबजावणीत नागपूर शहराचे अव्वल स्थान गेल्या अनेक आठवड्यांपासून कायम आहे. यावर केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयानेही शिक्कामोर्तब केले. शहरातील पूर्व नागपुरातील १७३० एकरांत हा  प्रकल्प राबविण्यात येत असून नुकतेच त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

नागपूर - दुसऱ्या टप्प्यात निवड होऊनही ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प अंमलबजावणीत नागपूर शहराचे अव्वल स्थान गेल्या अनेक आठवड्यांपासून कायम आहे. यावर केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयानेही शिक्कामोर्तब केले. शहरातील पूर्व नागपुरातील १७३० एकरांत हा  प्रकल्प राबविण्यात येत असून नुकतेच त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय दर आठवड्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मानांकन  जाहीर करीत असून मागील आठवड्यात नागपूर अव्वल स्थानी कायम आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून नागपूर अव्वल स्थानी आहे. पूर्व नागपुरात भरतवाडा, पूनापूर, पारडी, भांडेवाडीचा काही भाग, अशा एकूण १७३० एकरांत स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत असून जागतिक दर्जाच्या शापूर्जी पालनजी या कंपनीला कामाचे कार्यादेश देण्यात आले आहे. 

या क्षेत्रासाठी राज्य सरकारने टाऊन प्लॅनिंग स्कीमही मंजूर केली. गेल्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पात ५५ किमीचे नवे रस्ते तयार करण्यात येणार असून व्यावसायिक संकुल, सिवेज लाइन, ड्रेनेज लाइन, फूटपाथ, उद्यान, वैद्यकीय सुविधांचा समावेश आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामाच्या निविदा मंजुरी, कार्यादेश आदीच्या आधारावर केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने काल, ६ फेब्रुवारी रोजी घोषित केलेल्या मानांकनात नागपूरचे स्थान अव्वल आहे. 

विशेष म्हणजे नागपूरचे नाव स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या यादीत घोषित करण्यात आले होते.  त्यानंतरही नागपूरच्या स्मार्ट सिटी एसपीव्हीने अंमलबजावणीत अव्वल स्थान पटकावले. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर शहरांचा समावेश होता. सद्यस्थितीत पुणे व सोलापूर दोन्ही शहरे मागे पडली आहेत. दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेशातील भोपाळ शहर असून रांची तिसऱ्या तर गुजरातेतील अहमदाबाद व सुरत अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहे. 

१ लाख ३० हजार नागरिकांना लाभ 
स्मार्ट सिटी प्रकल्पाचा भरतवाडा, पूनापूर, पारडी, भांडेवाडीतील एकूण १ लाख ३० हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे. या प्रकल्पात २५ हजार कुटुंबाच्या जीवनात आमूलाग्र बदल होणार आहे. यातील ८०० घरे या प्रकल्पात पूर्णपणे जाणार असून १२०० घरांचा काही भाग जाणार आहे. प्रकल्प राबवित असतानाच बाधित कुटुंबांना घरे देण्यात येणार आहेत.

Web Title: Smart City Project Nagpur Topper