‘स्मार्ट सिटी’ योजनेत संत्रानगरीची भरारी

‘स्मार्ट सिटी’ योजनेत संत्रानगरीची भरारी

नागपूर - नव्या वर्षाची सुरुवातच झाली ती स्मार्ट सिटी योजनेत नागपूरचा समावेश कधी होईल? या प्रश्‍नाने. पहिला, दुसऱ्या टप्प्यात निवड न झालेल्या नागपूरची निवड तिसऱ्या टप्प्यात झाली अन्‌ महापौरांसह नागपूरकरांत उत्साह संचारला. ग्रीन बससह नवे चार ऑपरेटर, लाडली लक्ष्मी योजना, मुलींना ध्वजारोहणाचा अधिकार आदी उपक्रम, योजनांमुळे २०१६ हे वर्ष महापालिकेसाठी अनेक स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण ठरले. असे असले तरी रस्त्यांवरील खड्ड्यांनी सामान्य नागरिकांना चांगलेच त्रस्त केले. त्यामुळे रस्त्यांमध्ये घोटाळ्याच्या आरोपालाही महापालिकेला सामारे जावे लागले. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने सत्ताधाऱ्यांनी नागपूरकरांना वर्षाच्या शेवटी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली.

मेट्रो रेल्वे कोच निर्मिती केंद्र नागपुरात 
मेट्रो रेल्वेचे कामे वेगाने सुरू असून, आतापर्यंत अंबाझरी रेल्वे स्टेशन, खापरी रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन पार पडले. नुकतेच मेट्रो रेल्वे देखभाल दुरुस्तीसाठी डेपोचेही भूमिपूजन झाले. या वर्षातील प्रमुख घटनेत मेट्रो रेल्वेचे कोच नागपुरात निर्माण करण्यासाठी झालेला करार महत्त्वाचा आहे. चीनसोबत राज्य शासनाने मेट्रो रेल्वेचे डबे येथे तयार करण्यासाठी करार केला. त्यामुळे देशभरात नागपुरातून मेट्रो रेल्वे प्रकल्पांना रेल्वे डबे पुरविले जाणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीही होणार आहे. 

दीड दशके उभा उड्डाणपूल भुईसपाट 
शहरात गेली अठरा वर्षे उभा छत्रपतीनगर चौकातील उड्डाणपूल या वर्षात पाडण्यात आला. १५ नोव्हेंबरपासून उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात करण्यात आली. अत्याधुनिक यंत्रणा, दोनशे कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पथकाने केवळ आठ दिवसांत उड्डाणपूल भुईसपाट करीत वर्धा मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू केली. नागपूर शहरवासींच्या आठवणी या उड्डाणपुलाशी जुळल्या होत्या. आठही दिवस छत्रपतीनगर चौकात नागरिकांची गर्दी दिसून आली. या उड्डाणपुलाच्या स्मृती म्हणून दोन पिलर कायम ठेवण्यात आले. अठरा हजार क्‍युबिक मीटरचा सिमेंटचा मलबा येथून काढण्यात आला. आठ दिवस २४ तास कामे करीत मेट्रो रेल्वेने हा नागपूरच्या इतिहासात जमा केला.

नव्या स्टार बस, ग्रीन बस 
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पर्यावरणपूरक व बळकट करण्यासाठी यंदा महापालिकेने पाऊल उचलले. जुन्या वंश निमयला अंतिम नोटीस देऊन नव्या चार ऑपरेटरची नियुक्ती केली. यात शहरात नव्या पर्यावरणपूरक ५५ ग्रीन बस व २३५ नव्या स्टार बसची भर पडणार आहे. यातील १० ग्रीन बस व नव्या १५ स्टार बसचे लोकार्पण करण्यात आले. शहर बस वाहतुकीचे संचालन करण्यासाठी चार ऑपरेटरवर दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मॉडेल ट्रांझिट सिस्टिम लिमिटेडचे नियंत्रण राहणार असून, नागपूरकरांना सुखद व आनंददायी प्रवासाची भेट महापालिकेने दिली. 

स्मार्ट सिटी योजनेत निवड 
केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या दोन टप्प्यात निराश झालेल्या नागपूरकरांना सप्टेंबरमध्ये घोषित तिसऱ्या टप्प्यात आनंदाचा क्षण अनुभवास आला. केंद्राने नागपूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला अन्‌ विकासकामांना वेग आला. उच्च न्यायालय ते खामला चौकापर्यंत स्मार्ट स्ट्रीटचे काम वेगाने सुरू असून, स्मार्ट सिटीसाठी एसपीव्ही कंपनीची स्थापना व त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने स्मार्ट सिटीची प्रवास सुरू झाला. वर्षाच्या शेवटी नागपूरला ‘बेस्ट स्मार्ट सिटी’चा पुरस्कार देऊन दिल्लीत गौरव करण्यात आला. दरम्यानच्या काळात सिडकोने स्मार्ट सिटीसाठी ५० कोटी रुपये दिले. वर्षाच्या शेवटी १९४ कोटी रुपये केंद्र शासनाकडून मिळणार असल्याची वार्ता महापालिकेत धडकली. 

समाधान शिबिरातून दिलासा
राज्य शासनाने नागपुरातील सहाही विधानसभा क्षेत्रांत समाधान शिबिराचे आयोजन करीत नागरिकांना दिलासा दिला. याच धर्तीवर नागपूर सुधार प्रन्यासने विभागीय कार्यालयातून समाधान शिबिर आयोजित केले. अनेक वर्षांपासून नागरिकांचे रखडलेले आरएल, डिमांड नागपूरकरांना देण्यात आले. एवढेच नव्हे नागपूर सुधार प्रन्यासने शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. नासुप्रने मोठ्या ताजबागच्या सौंदर्यीकरणाला वेग दिला असून कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचीही या वर्षी पायाभरणी केली.

पुन्हा ३०० कोटींचे सिमेंट रस्ते 
शहरात दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांच्या जाळे पसरविण्यास मागील वर्षी सुरुवात झाली. या वर्षात सिमेंट रस्त्यांच्या कामाला वेग आला. एकूण ३०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांनंतर यंदाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीनशे कोटींच्या सिमेंट रस्त्यांसाठी मंजुरी दिली. यात महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास व राज्य शासन प्रत्येकी १०० कोटी रुपये देणार आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात सिमेंट रस्त्यांसाठी रस्ते खोदल्याचे चित्र आहे. 
 

लाडली लक्ष्मी योजना पुन्हा सुरू 
वयाच्या २१ व्या वर्षी मुलीच्या शिक्षणासाठी किंवा तिला तिच्या पायावर उभे राहण्यासाठी महापालिकेने मागील वर्षी थाटात लाडली लक्ष्मी योजना सुरू केली. परंतु इन्शुरन्सी रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ॲथॉरिटीमुळे बंद झाली होती. आता यंदा पुन्हा महापालिकेने ही योजना सुरू केली. विशेष म्हणजे यंदा महापालिकेने या योजनेसाठी निधीची तरतूद करीत गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांना दिलासा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com