कारवाईचा फक्त धूर, धूम्रपान बंदी मात्र दूर!

Smoking
Smoking

नागपूर - शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास कायद्याने बंदी घातली आहे. मात्र, कारवाईसाठी यंत्रणा सज्ज नसल्यामुळे कारवाई शून्य आहे. नागपूर शहर पोलिसांनी केवळ ४६ जणांवर धूम्रपान बंदी कायद्याअंतर्गत कारवाई केली असून हुक्‍का पार्लरला मात्र टार्गेट केले आहे. गुन्हे शाखेचा वचक असल्यामुळे शहरातील हुक्‍का पार्लर जवळपास हद्दपार झाले आहेत. 

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची दखल घेऊन शासनाने २००८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. निर्णयाला दहा वर्षांचा काळ पूर्ण झाला. तरीही या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. हा कायदा अस्तित्वात आला असला तरी त्याची ठोस अशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. 

कायदा कडक असला तरी अंमलबजावणी करणाऱ्यांचीच मानसिकता कमकुवत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. त्यामुळे दोष कुणाचा कायद्याचा की कायदा हाताळणाऱ्यांचा, हा खरा प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून दंड वसूल करण्याचे निर्देशित करण्यात आले. या दहा वर्षांत किती नागरिकांवर कारवाई करण्यात आली, हा खरा संशोधनाचा विषय आहे. परंतु दहा वर्षांचा कालावधी संपला तरी शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरूच आहे. शहरातील बसथांबे, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी संस्था यांसह अनेक सार्वजनिक ठिकाणी अनेक जण खुलेआमपणे तंबाखू, मावा, खर्रा, विडी, सिगारेट पिताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या जनसामान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.  

उत्सुकतेपोटी घेतात झुरके
धूम्रपान करणे हे ‘स्टेटस सिम्बॉल’ असल्याचे मानले जाते. सिगारेटचे सर्वाधिक व्यसन महाविद्यालयीन तरुणांमध्ये आढळले. पूर्वी युवतींमध्ये तुरळक दिसणारे सिगारेटचे व्यसन आता वाढले आहे. 

जरी सिगारेट ओढल्यामुळे फुप्फुसाचा रोग, कॅन्सर आणि अन्य श्‍वासोच्छ्वासाचे रोग होत असल्याचे उघड असले तरी सवय आणि उत्सुकतेपोटी ओढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील पान शॉप, हॉटेल्स, रस्त्यावरील छोटी दुकाने आणि चहाटपऱ्यांवर युवक आणि युवतींचे घोळके सिगारेटचे झुरके घेताना आढळतात.

शाळकरी मुलांमध्ये व्यसन
प्रशासकीय यंत्रणेने शासननिर्णयाच्या अंमलबजावणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कायद्यानुसार १८ वर्षांच्या खालील मुलाने तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई आहे. परंतु, पानटपरीवर बसून लहान मुले सर्रास तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना दिसत आहे. शाळकरी मुलांमध्ये सिगारेटचे व्यसन आढळून येते. अनेक शाळकरी विद्यार्थी लपून झुरके घेताना आढळतात.

पार्लर चालविणाऱ्यांवर चाप
हुक्‍का पार्लरवर बंदी येण्यापूर्वीच गुन्हे शाखेचे डीसीपी संभाजी कदम यांनी छापेमारी सुरू केली होती. त्यामुळे हुक्‍का पार्लरच्या संचालकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. गुन्हे शाखेने आतापर्यंत २५ हुक्‍का पार्लरवर छापे घालून गुन्हे दाखल केले. त्यामुळे चोरून लपून पार्लर चालविणाऱ्यांनाही चाप बसला. हुक्‍का पार्लरमध्ये युवकांपेक्षा युवतींचा समावेश सर्वाधिक असल्याचे कारवाईवरून समोर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com