खवले मांजरांची तस्करी वाढली

खवले मांजरांची तस्करी वाढली
नागपूर : देशात सर्वत्र आढळणाऱ्या "पॅंगोलिन' म्हणजेच खवले मांजराची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. खवल्या मांजराची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचरने (आययूसीएन) चिंता व्यक्त केली आहे. चीन आणि व्हिएतनाम येथे सर्वाधिक या प्राण्याची तस्करी औषधी गुणधर्मासाठी केली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सस्तन प्राण्यांत समाविष्ट असलेले खवले मांजर भारतीय वन्यजीव कायद्याद्वारे अनुसूची एकमध्ये येतो. तरी त्याच्या खवल्यांची आणि मांसाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. त्यामुळे खवले मांजरावर मोठे संकट आले आहे. भारतातील सर्वत्र खवले मांजरांचा वावर आहे. अंगावर पूर्णपणे खवले असल्याने, खवले मांजरात रोगप्रतिबंध करण्याची क्षमता असल्याची लोकभावना रूढ आहे. त्यासाठी त्याची शिकार करण्यात येते. मांस चवदार, पौष्टिक आणि औषधी गुणधर्माने युक्त असल्याकारणातून खवले मांजर शिकाऱ्यांचे बळी ठरत आहेत. 1990 पासून त्याच्या मांस आणि खवल्यांच्या तस्करीत वाढ झाल्याने 1998 साली कमी संकटग्रस्त हा दर्जा काढून खवले मांजराची प्रजाती 2014 साली संकटग्रस्त प्रजातीत समाविष्ट केली आहे. त्याच्या कातडीपासून जॅकेटही तयार केले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात खवल्या मांजराला प्रचंड मागणी असून जिवंत आणि मांसाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जॉर्ज तृतीयला चिलखत भेट
ईस्ट इंडिया कंपनीचे कोलकत्याचे गव्हरर्नर यांनी 1820 साली ब्रिटनचा राजा जॉर्ज तृतीयला खवले मांजराच्या खवल्यांचा कल्पकतेने वापर केलेले चिलखत भेट दिले होते. त्यावरून या प्राण्यांची खवले शिकारी काढून चिलखतासाठी वापर करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

खवल्या मांजराच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्याबद्दल वनविभागाकडून जनजागृती करण्यात येत असून कार्यशाळाही घेण्यात येत आहेत.
-नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

तीन वर्षांपासून खवल्या मांजराच्या संरक्षणासाठी वनविभागासोबत काम सुरू केलेले आहे. मात्र, त्याची संख्या किती, हे अद्यापही पुढे आलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यात याबद्दल जनजागृती केली जात असल्याने यावर्षी 12 खवल्या मांजरांना रेस्क्‍यू करून जंगलात सोडले आहे.
-भाऊ काटधरे, खवले मांजर संवर्धक

औषधी गुणधर्म असल्याची धारणा असल्याने शिकार करून खवल्या मांजराची तस्करी केली जाते. तसेच जिवंत खवल्या मांजर घरात ठेवल्यास "गुड लक' समजण्यात येते. यामुळे खवल्या मांजराची प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
-नितीन देसाई, संचालक वाइल्ड लाइफ प्रोटेक्‍शन ऑफ इंडिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com