एसएनडीएलची "पॉवर' कट?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नागपूर : फ्रेन्चायझी क्षेत्रातील वीजवितरणाची जबाबदारी "टेकओव्हर' करण्याचे स्पष्ट संकेत महावितरणकडून मिळाले आहेत. एसएनडीएलसोबतचा कारार रद्द केल्यास, निर्माण होणारी परिस्थिती योग्यरीत्या हाताळण्याच्या दृष्टीने दहाहून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नागपुरात बदल्या करण्यात आल्या आहेत. या सोबतच महावितरणचे संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू यांनी आज एसएनडीएलसोबतच वीज क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या स्टेक होल्डर्सच्या प्रतिनिधींसोबतही चर्चा केली.
महाल, गांधीबाग आणि सिव्हिल लाइन्स विभागातील साडेपाच लाख ग्राहकांकडे वीजपुरवठ्याची जबाबदारी एसएनडीएलकडे आहे. एसएनडीएलने ही व्यवस्था सांभाळण्यात असमर्थता व्यक्त करीत महावितरणलाच जबाबदारी स्वीकारण्यासंदर्भात 12 ऑगस्टला पत्र दिले आहे. यानंतर कर्मचारी आणि कंत्राटदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यातच महावितरणनेसुद्धा हे आव्हान स्वीकारण्याची तयारी केली आहे.
राज्याच्या विविध भागांतील 3 कार्यकारी अभियंता आणि 8 उपकार्यकारी अधिकाऱ्यांच्या नागपुरात बदल्या केल्या आहेत. महावितरणने ही जबाबदारी आपल्याकडे घेतल्यास ती योग्यरीत्या हाताळण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. दिनेशचंद्र साबू यांनी आज बिजलीनगर विश्रामगृहात एसएनडीएलचे कर्मचारी, कंत्राटदार, वेंडर्स यांच्यासोबतच वीजवितरणाचा अनुभव असणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबतही चर्चा केली. करार रद्द झाला तरी एसएनडीएल, महावितरण आणि कंत्राटदार सुमारे महिनाभर संयुक्तरीत्या ही सेवा सांभाळतील. वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, यादृष्टीने तजविज केली जात असल्याची माहिती आहे.
एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी कामगार नेते मोहन शर्मा यांच्या नेतृत्वात साबू यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यांचे थकीत वेतन आणि भत्ते दिले जातील, अशी ग्वाही त्यांना मिळाली. कंत्राटदारांनासुद्धा अमानत रकमेतून संपूर्ण मोबदला देण्याचे आश्‍वासन मिळाले.
दिनेशचंद्र साबू यांनी करार रद्द करण्यासंदर्भात भविष्यात निर्णय होण्याचे स्पष्ट संकेत दिले. महावितरणचे अधिकारी मात्र एका न्यायप्रविष्ट प्रकरणात माहिती सादर करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी ते शहरात आले असल्याचे सांगत होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sndl will be powerless