माध्यमांनी सामाजिक बांधीलकी जपावी - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नागपूर - मामासाहेब कधीही कुठल्याही प्रलोभनांना शरण गेले नाहीत. याउलट त्यांनी आयुष्यभर आपली लेखणी तळपत ठेवली. माध्यमांनी तशीच सामाजिक बांधीलकी आणि कटिबद्धता जपावी, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  येथे केले. 

नागपूर - मामासाहेब कधीही कुठल्याही प्रलोभनांना शरण गेले नाहीत. याउलट त्यांनी आयुष्यभर आपली लेखणी तळपत ठेवली. माध्यमांनी तशीच सामाजिक बांधीलकी आणि कटिबद्धता जपावी, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  येथे केले. 

मुंबईतील सरोजनी अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या कमलकांत साहित्य पुरस्कारासाठी ज्येष्ठ संपादक दि. भा. घुमरे उपाख्य मामासाहेब घुमरे यांची निवड करण्यात आली. कौटुंबिक सोहळ्यात वंजारीनगर येथील घुमरे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन गडकरी यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. रोख रक्‍कम, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. ज्येष्ठ होमिओपॅथ आणि नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे, ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, मामा यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत सामाजिक बांधीलकी जपली. पत्रकारितेत प्रलोभनं दिली जातात, अनेक जण बळीही पडतात. मात्र, मामासाहेब कधीही कुठल्याही प्रलोभनांना बळी पडले नाही. त्यांनी आयुष्यभर लेखणीने अनेकांवर हल्ला केला. आणीबाणीच्या काळात मिसाबंदी कायदा लागू असतानाही त्यांनी सडेतोडपणे तत्कालीन राजकीय परिस्थितीवर हल्ले चढविले. दूरदृष्टीसोबतच परखड विचारांचे संतुलन त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य राहिले. सुरुवातीला अकादमीचे अध्यक्ष डॉ. शि. गो. देशपांडे यांनी पुरस्कारांमागची भूमिका स्पष्ट केली. घुमरे यांच्या वतीने त्यांच्या स्नुषा सुषमा यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संचालन डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले.

Web Title: social commitment of the media say gadkari