सोशल मीडिया झाला पाचवा स्तंभ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

नागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत जनतेला संभ्रमाच्या स्थितीतून बाहेर काढण्याची क्षमता यात आहे. अतिशय जलद गतीने संदेशांची देवाणघेवाण होत असल्याने आता सोशल मीडिया पाचवा स्तंभ झाल्याचे मत सोशल मीडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केले.

नागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत जनतेला संभ्रमाच्या स्थितीतून बाहेर काढण्याची क्षमता यात आहे. अतिशय जलद गतीने संदेशांची देवाणघेवाण होत असल्याने आता सोशल मीडिया पाचवा स्तंभ झाल्याचे मत सोशल मीडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केले.
नुकत्याच पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर करून एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक केली होती. या पार्श्‍वभूमीवर पारसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, फेसबुक, व्हॉट्‌सअप, ट्विटर या सोशल मीडियाच्या साधनांची वेळोवेळी उपयुक्तताही सिद्ध झाली. परंतु प्रतिमा मलिन करणे, नको ते संदेश पसरविले गेल्याने त्याचा दुरुपयोगही होत आहे. त्यावर विश्‍वास ठेवून करण्यात आलेल्या वृत्तांकनामुळे पत्रकारांच्या व पर्यायाने पारंपरिक प्रसारमाध्यमाच्या प्रतिमेलाही तडे गेले. हे बघता सोशल मीडिया आणि पारंपरिक प्रसार माध्यमांसोबत ताळमेळ बसविण्याची गरज आहे. देशहितामध्ये अडथळा ठरत असलेल्या शहरी नक्षलवादाला संपुष्टात आणण्यासाठी सोशल मीडिया मोठे अस्त्र ठरू शकते. आताचे युद्ध शस्त्र किंवा सैनिकांसह नव्हे तर विकृत विचाराची पेरणी करून लढले जात आहे. यासाठी देशद्रोही संघटना सोशल मीडिया वारियर फॉर मास डिस्ट्रक्‍शन'ला प्रमुख शस्त्र करीत जनतेत विकृतीचे विष पसरवित आहे. अशा विचाराची व्यक्ती आपल्या सभोवतीच्या व्यक्तींचे वैचारिक तसेच सामाजिक स्तरावर नुकसान करू शकते. सोशल मीडिया "टीआरपी'साठी काम करीत नाही. त्याचा उपयोग वंचित लोकांना न्याय देण्यासाठी करावा, असे आवाहनही पारसे यांनी केले.  
न्यायालयाची भूमिका बजावणे अयोग्य
निर्णय देणे न्यायपालिकेचे काम आहे. मात्र, सोशल मीडियातून आपणच न्यायाधीश आहोत अशा आविर्भावात आपले निर्णय जाहीर केले जातात.
नुकतेच एका मंत्र्याला सोशल मीडियाने दोषी ठरविल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. "कॅंब्रिज अनलिटिका' या सामाजिक संस्थेनेही पटेल आंदोलनात चुकीची भूमिका सोशल मीडियातून पसरविली. काही विदेशी संघटना जाणीवपूर्वक अफवा पसरवितात. त्यामुळे देशात अशांती पसरत आहे. त्यामुळे येथील संदेशावर डोळे लावून विश्‍वास ठेवू नये. त्याची खातरजमा करावी. सोशल मीडियाने प्रत्येकालाच रिपोर्टर व्हायची संधी दिली आहे. ऑनलाइन लेखणीमुळे पंचायत ते पार्लमेंटपर्यंत धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत परंपरागत माध्यमाने सोशल मीडियाचा योग्य वापर करणे अनिवार्य आहे. अन्यथा सोशल मीडियाच्या सावलीत माध्यमे केवळ जाहिरातीपुरती मर्यादित होतील, अशी शक्‍यताही पारसे यांनी व्यक्त केली.

Web Title: Social media became the fifth column