सॉफ्टवेअर इंजिनिअर गडचिरोलीतील बालकांना लावतेय शिक्षणाची गोडी, पगारातील १० % रक्कम ठेवते राखून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ishita Kale

अभियांत्रिकीची पदवी घेतली असल्याने खरेतर मिळालेल्या छान पगाराच्या नोकरीत कुणीही आनंदाने जगू शकतो. पण ‘ती’ मात्र केवळ नोकरीत आनंदी नव्हती.

Gadchiroli : सॉफ्टवेअर इंजिनिअर गडचिरोलीतील बालकांना लावतेय शिक्षणाची गोडी, पगारातील १० % रक्कम ठेवते राखून

गडचिरोली - अभियांत्रिकीची पदवी घेतली असल्याने खरेतर मिळालेल्या छान पगाराच्या नोकरीत कुणीही आनंदाने जगू शकतो. पण ‘ती’ मात्र केवळ नोकरीत आनंदी नव्हती. तिच्या हळव्या मनाला चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागांतील बालकांची केविलवाणी स्थिती सहन झाली नाही. ती थेट या अतिदुर्गम भागांत पोहोचली व तेथील मुलांना खेळांच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी लावत आहे. यिशीता काळे असे या तरुणीचे नाव. या कार्यात तिची मैत्रीण अश्विनी चौधरीसुद्धा तिला मदत करत आहे.

अमरावती विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेणारी यिशीता मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील. तिचे वडील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमीटेडमध्ये अधिकारी होते. महाविद्यालयात रासेयोत काम करताना तिला समाजकार्याची ओढ लागली. शिक्षण पूर्ण केल्यावर तिला एका सॉफ्टवेअर कंपनीत चांगली नोकरीही लागली. मात्र, समाजातील वंचितांसाठी काहीतरी करावे हा विचार तिला स्वस्थ बसून देत नव्हता. तिने आधी राजुरा तालुक्यातील इंदिरानगर वसाहतीत व इतर परिसराती बालकांसाठी काम सुरू केले. तिचे कार्य विस्तारू लागले. आता ती गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागांतील गावांमध्ये जात तिथल्या बालकांना अनेक खेळ शिकवत त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगते.

यिशिताने विश्वास सोशल फाउंडेशन ही सेवाभावी संस्थाही स्थापन केली. मागील वर्षी तिने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांतील शाळा हा उपक्रम राबवला होता. यंदा समर कॅम्प ऑन व्हील असा उपक्रम राबवत असून जिल्ह्याच्या अनेक गावांना भेटी देत आहे. लहानग्यांमध्ये शाळेची आवड निर्माण व्हावी व त्यांच्यातील कलागुणांची ओळख व्हावी. तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी यिशीता काळे व तिची सहकारी अश्विनी चौधरी प्रयत्न करत आहे. दोघीही स्वतःच्या चारचाकी गाडीने अतिदुर्गम असलेल्या कमलापूर भागातील कोलसेगुडम, नैनीगुडा, ताटीगुडा तसेच पेरमेली आदी गावांमध्ये जातात व तेथे बालकांना खेळाच्या माध्यमातून शिक्षणविषयक अनेक गोष्टी शिकवतात. तेथील आदिवासी मुला-मुलींशळी अनेक विषयांवर चर्चा करतात. मागील १० वर्षांपासून आदिवासी मुलांसाठी हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जागा मिळेल तिथे मुक्काम

अतिदुर्गम भागांत अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असतानाही कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न बाळगता, येणाऱ्या संकटांची, अडचणींची पर्वा न करता यिशीता काळे गावांतील चिमुकल्यांना भेटते. या गावांपर्यंत पोहोचायला बराच वेळ लागतो. अनेकदा मुक्काम करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळेस एखाद्या घराच्या पडवीतही यिशीता आणि तिचे सहकारी मुक्काम करतात. या बालकांसाठी विविध खेळ घेताना त्यांना छोट्या, मोठ्या भेटवस्तूही देते. तिचा प्रवास, जेवण, खेळाचे साहित्य, भेटवस्तू या सगळ्यांचा खर्च ती स्वत: उचलते. यासाठी ती आपल्या पगारातील दहा टक्के आणि वडिलांच्या पेन्शनमधील दहा टक्के रक्कम राखून ठेवते.