वीज कर्मचाऱ्यासह मुलाचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

फुलसावंगी (जि. यवतमाळ) : येथील कंत्राटी वीज कर्मचारी व त्यांच्या मुलाचा गुरुवारी (ता. 1) दुपारी चार वाजता अपघाती मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी व दोन मुले जखमी झाले. नांदेड येथील आसना नदी ते शंकरराव चव्हाण चौक रस्त्यावर एका मंगल कार्यालयासमोर कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने हा अपघात झाला.

महावितरणचे कंत्राटी कर्मचारी शेख मुस्तफा शेख शरीफ (वय 40) दुचाकीने पत्नी व तीन मुलांसह नांदेड येथे नातेवाइकांच्या भेटीसाठी जात होते. नांदेड येथील आनंद सागर मंगल कार्यालयासमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात कंटेनरने जबर धडक दिली. या धडकेने दुचाकीवरील पत्नी व दोन मुले दूर फेकले गेले. मात्र, दुचाकीसह शेख मुस्तफा व मोठा मुलगा शेख हुजेफ (वय 15) कंटेनरच्या मध्यभागी सापडले. या भीषण अपघातात शेख मुस्तफा यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा शेख हुजेफची प्राणज्योत उपचारादरम्यान मावळली. घटनेची माहिती फुलसावंगीत पोहोचताच अनेकांनी नांदेडकडे धाव घेतली. पितापुत्राचे मृतदेह रात्री उशिरा फुलसावंगीत पोहोचले. आज, शुक्रवारी सकाळी 10 वाजता पिता-पुत्राला एकाच वेळी येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले. यावेळी फुलसावंगीची बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son and father dead in accident