पंचविशीतील मुलांनी केले वडिलांचे देहदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

नागपूर - देहदान होत नसल्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मानवी शरीर मिळत नाही. समाजात पसरलेल्या गैरसमजामुळे देहदानाच्या चळवळीला गती मिळत नाही. मात्र, नुकतेच पंचविशीतील मोहित आणि मिथिल या दोन भावंडांनी देहदानासाठी नातेवाइकांकडून होत असलेला विरोध पत्करून आपल्या वडिलांचे देहदान करून समाजाला देहदानाचा संदेश दिला.

मिलिंद काळे यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. अंत्यसंस्काराची तयारी झाली. परंतु, मोहित आणि मिथिल या दोन्ही मुलांनी अंत्यसंस्कार न करता आई मीना काळे यांना विश्‍वासात घेतले. मृत्यूनंतर वडिलांची राख बघण्यापेक्षा अनेक विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी वडिलांचे शरीर अभ्यासासाठी कामी येईल. विद्यार्थ्यांच्या पदवी संपादनासाठी देहदान हे पुण्यकर्म ठरेल अशी समजूत काढली. नातेवाइकांचा विरोध कायम होता. मात्र, वडिलांच्या मृत्यूचे दुःख पचवून आईला धीर देत मोहित आणि मिथिल यांनी शोकाकुल नातेवाइकांना देहदानाचे महत्त्व पटवून दिले. काहींनी अखेरपर्यंत विरोध केला. दोन्ही मुले जुनाट, खुळचट विचाराला तिलांजली देत देहदान करण्यावर ठाम राहिले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, मेडिकलच्या शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. फुलपाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ. तारकेश्‍वर गोडघाटे यांच्याशी संवाद साधला आणि लगेच रुग्णवाहिकेतून वडिलांचे पार्थिव मेडिकलमध्ये पोहोचवले. देहदानासंदर्भातील सर्व कार्यवाही पूर्ण केली. सर्व शोकाकुल नातेवाइकांना मेडिकलच्या शरीररचनाशास्त्र विभागात बोलावून येथे वडील मिलिंद काळे यांना आदरांजली अर्पण करून देहदान करण्यात आले. डॉ. फुलपाटील, डॉ. श्रीगिरीवार आणि डॉ. गोडघाटे यांनी पंचविशीतील मुलांचे कौतुक केले. देहदान चळवळीला अशी कृतिशील प्रेरणा देण्याची गरज असल्याचे मत या वेळी डॉ. श्रीगिरीवार यांनी व्यक्त केले.

Web Title: Son donated body of their father