काटोल ः शिक्षणदिनी आलागोंदी शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलींच्या चेह-यावरील हास्य.
काटोल ः शिक्षणदिनी आलागोंदी शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलींच्या चेह-यावरील हास्य.

पालावरच्या सावित्रीच्या लेकींसाठी "सोनियाचा दिनु'

काटोल (जि.नागपूर) ः जनावरांसोबत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सतत हिंडणाऱ्या गुराखी कुटुंबातील मुलींसाठी शिक्षक अशक्‍यप्राय होते. शिक्षणापासून दूर गेलेल्या या परराज्यातील मुलींचा शोध घऊन त्यांना ग्रामस्थ व मुख्याध्यापकांनी हात धरून शाळेकडे वळविले. आयुष्यात पहिल्यांदा शाळेत गेल्याचा आनंद मुलींच्या चेहऱ्यावर झळकत होता. 

स्वातंत्र्य मिळून अनेक दशके झाली, परंतु आजही समाजातील काही विद्यार्थी शिक्षणापासून कोसो दूर आहेत. मूळचे गुजरात येथून आलेले लाल गायीवाले सर्वांना परिचित आहे. जिथे जनावरांच्या चारा आणि पाण्याची सोय होते, तिथे जंगलाच्या आडोशाला ते राहतात. मरगसुर शिवारात मॉं भवानी माता देवस्थान, चौकीगड येथे अलगोतर परिवार वास्तवाला असल्याची माहिती आलागोंदी येथील ग्रामस्थ मनोहर नेहारे यांनी जि. प. प्राथमिक शाळा, आलागोंदी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र टेकाडे यांना दिली.

मुख्याध्यापक, ग्रामस्थ व माजी पंचायत समिती सदस्य वसंतराव टेकाम यांनी त्यांच्या झोपडीला भेट दिली. पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आपल्या मुलींना शाळेत टाकण्याविषयी विनंती केली. शाळेपासून त्यांचे निवासाचे अंतर दोन किलोमीटर असल्यामुळे पालकांनी असमर्थता दर्शविली. मात्र, मुख्याध्यापक राजेंद्र टेकाडे यांनी त्यांना ने-आण करण्याची जबाबदारी स्वतः घेतली. त्यानंतर पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयार झाले. सोमवारी (ता.11) भारताचे प्रथम शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनी म्हणजेच भारतीय शिक्षणदिनी हसू कला अलगोतर (वर्ग 1ली), बाघू कला अलगोतर (वर्ग 2) व मंनु मोहन अलगोतर (वर्ग 3रा) यांना शिक्षणाच्या कायद्यांतर्गत वयानुरूप प्रवेश देण्यात आला. यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून अनेकांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित होणार आहे. 

शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. वंचित विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांनी व शिक्षकांनी शोध घेतल्यास कुणीही शिक्षणापासून दूर राहणार नाही. 
- दिनेश धवड, गटशिक्षणाधिकारी, पं. स. काटोल 


आलागोंदी शाळा विविध उपक्रमामुळे नावरुपास आलेली आहे. शिक्षक व समाज यांचे नाते दृढ झाल्यास शाळेची प्रगती गतीने होते. 
- हरिभाऊ मोहतकर, उपसरपंच, ग्रामपंचायत, मरगसुर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com