ये एक आग का दरिया हैं..!

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (संग्रहित छायाचित्र)
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (संग्रहित छायाचित्र)

नागपूर - दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा गेल्या काही वर्षांमध्ये झालेला विस्तार, गैरव्यवहाराचे गालबोट, पडझडीतून सावरत उभारलेले नंदनवन या सर्वांचा भार पेलणे, हे नव्या संचालकांपुढील मोठे ‘सांस्कृतिक’ आव्हान असेल. केंद्राला गेल्या काळात मिळालेली अफाट लोकप्रियता आणि अचानक आलेली मरगळ या दोन अवस्थांचा अभ्यास केल्याशिवाय नव्या संचालकांना पुढे जाता येणार नाही, हेही तेवढेच खरे. थोडक्‍यात ‘एक आग का दरिया हैं... और डूब के जाना है’, असेच म्हणावे लागेल.

एक वर्षाच्या अंतराने दक्षिण मध्यला ज्येष्ठ तबलावादक दीपक खिरवडकर यांच्या निमित्ताने पूर्णवेळ संचालक मिळणार आहे. सांस्कृतिक घडामोडींचे शहरातील एक ठिकाण, एवढीच या केंद्राची ओळख नाही. देशातील सात राज्यांच्या लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी ही संस्था आहे. त्याचे मुख्यालय नागपुरात असणे हा केवळ तीस वर्षांपूर्वी घडून आलेला योगायोग आहे. मध्य आणि दक्षिण भारतातील राज्यांचे नेतृत्व करणारी संस्था म्हणून तिला ‘मध्यदक्षिणी’ असे संबोधले जाते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि नव्याने समाविष्ट होणाऱ्या गोवा या सात राज्यांची मोट बांधून लोककलावंतांचे भले करणे, हा मूळ उद्देश आहे. तीस वर्षांमध्ये निवडक संचालकांनी विपरित परिस्थितीत जगणाऱ्या लोककलावंतांना व्यावसायिक व्यासपीठ दिलेही. पण, ही परंपरा समर्थपणे पुढे नेणे, हा साधासुधा खेळ नाही. सात राज्यांचा डोलारा प्रशासकीय पातळीवर सांभाळण्याचे कसब दीपक खिरवडकर दाखवतील, अशी आशा केली जात आहे.

काही वर्षांपूर्वी गैरव्यवहाराच्या जळमटात केंद्र अडकले होते. अनेक आरोप झाले, केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. उपक्रमांना होणारी गर्दी आटली. नंतर परिस्थिती सुधारली असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) छाप्याने केंद्र पुन्हा एकदा वादात अडकले. त्यातूनही सावरलेच होते, तर केंद्रावर लोककलावंतांऐवजी व्यावसायिक कलावंतांवर पैसा उधळण्याचा आरोप होऊ लागला. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेले दक्षिण मध्य संपूर्ण देशातील सात केंद्रांपैकी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. देशाचा असा कुठलाही कोपरा नाही, जेथील लोककलावंत नागपुरात आले नसतील. ही व्याप्ती अधिक वाढविणे, सांस्कृतिक क्षेत्रातील बदलती समीकरणे स्वीकारणे आणि केंद्राचे मुख्यालय म्हणून नागपूरचे महत्त्व वाढविणे, ही ‘टास्क लिस्ट’ दीपक खिरवडकर यांच्या प्राधान्यक्रमावर असेल, असे समजायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com