खरीप राहणार पडिक! 

अनुप ताले  
गुरुवार, 13 जून 2019

  • पाणी नाही अन् पैसाही नाही
  • सुरवातीलाच पेरणीचे संकट
  • ​उत्पादनाला बसणार फटका 

अकोला : वळिवाचा पाऊस हरवला आणि मॉन्सूनही जून अखेरनंतर येणार! त्यामुळे आतासूनच पावसाचे संकट गडद झाले असून, हंगामाच्या सुरवातीलाच पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे यावर्षी खरिपात मोठ्या प्रमाणावर शेती पडिक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा थेट परिणाम राज्याच्या शेती उत्पादनावर होणार असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.

राज्यात 2018-19 मध्ये खरिपात एकूण सरासरी 149.74 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 94 टक्के म्हणजे 141.31 लाख हेक्टरवर पेरणी झाली. विदर्भ, मराठवाड्यात मात्र पावसाची अनियमितता असल्याने, 15 ते 20 टक्के पेरणी घटली.

सध्या सर्वत्र जलाशयांनी तळ गाठला असून, अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांची उमेद यंदाच्या पूर्वमॉन्सून, मॉन्सूनच्या पावसावर होती. मात्र यंदा वळिवाचा पाऊस पडलाच नसल्याने, कोठेही धूळ पेरणी होऊ शकली नाही. मॉन्सूनचे आगमनही राज्यात 20 जूननंतरच होण्याची शक्यता आहे. शिवाय शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. बँका कर्ज द्यायला तयार नाहीत, कृषी निविष्ठा महागल्या, अनुदानाचा पत्ता नाही, शासकीय शेतमाल खरेदी केंद्रांकडे कोट्यवधीचे चुकारे रखडले, यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, त्याचा परिणाम पेरणीवर होऊन, खरिपाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

मॉन्सूनपूर्व कपाशी नाही -
राज्यात 26 जिल्ह्यामध्ये जवळपास 42 लाख हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी होते. त्यापैकी जवळपास 20 टक्के पेरणी मॉन्सूनपूर्व म्हणजे मे च्या दुसऱ्या आठवड्यापासून वळिवाच्या पावसावर केली जाते. यंदा मात्र वळिवाचा पाऊस पडलाच नाही. शिवाय गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाने मॉन्सूनपूर्व कपाशी लागवड न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे यंदा मॉन्सूनपूर्व कापूस लागवड झाली नसून, त्याचा परिणाम कापूस उत्पादनावर दिसू शकतो. 

कीडीचे साम्राज्य फोफावणार -
मॉन्सून लांबल्यास पेरणी उशिरा होईल व उशिरा पेरणीमुळे कीडींचा प्रादूर्भाव वाढतो. शिवाय कपाशीवरील गुलाबी बोंडअळी, मक्यावरील लष्करी अळीच्या प्रादूर्भावाची शक्यता यंदा अधिक असून, भातावर निळे भुंगेरे, पिवळा खोडकिडा, सोयाबीनवर पाने खाणारी अळी, चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळी, कपाशीवर शेंदरी/गुलाबी बोंडअळी, रस शोषणाऱ्या कीडी, भुईमुंगावर हुमणी तर, उसावर शंखी गोगलगाय, लोकरी मावा, हुमणी कीडीचा प्रादूर्भाव अधिक राहण्याची शक्यता आहे. 

शेतकरी अडचणीत -
गेल्यावषी पीक उत्पादनात घट, शेतमालाला भाव कमी, शासकीय शेतमाल खरेदीचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे रखडले, सरकार शेतमाल खरेदी करायला तयार नाही, बँका कर्ज मिळेना, यासर्व बाबींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. शिवाय बियाणे, कृषी निविष्ठा प्रचंड महागल्या, मजुरी वाढली आणि अनुदानाचाही पत्ता नाही, यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, त्याचा परिणाम पेरणी क्षेत्रावर पर्यायाने, राज्याच्या शेतमाल उत्पादनावर होऊ शकतो. 

12 जूनपर्यंत विभागात पडलेला पाऊस -
 

जिल्हा अपेक्षित पाऊस (मिमी) पडलेला पाऊस (मिमी)
अकोला 58.4 13.1
अमरावती 54.1 19.4
यवतमाळ 70.3 8.4
बुलडाणा 56.6 9.1
वाशीम 65.6 14.5 
एकूण

61.9

12.9

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sowing crisis due to monsoon delay