शेतकऱ्याचे घर जळाले; कापूस, सोयाबीन खाक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

पंधरा ते वीस क्विंटल कापूस, पंचवीस ते तीस पोती सोयाबीन, वीस पाइप, शेतीचे इतर साहित्य असे एकूण अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे आगपीडित शेतकरी नीलकंठ राघोर्ते यांनी सांगितले. 

कुही, (जि. नागपूर) : तालुक्‍यातील मांढळनजीकच्या वग येथे नीलकंठ राघोर्ते यांच्या घराला रविवारी सकाळी अचानक आग लागली. यात त्यांचा कापूस, सोयाबीनची पोती व शेतीकामासाठी वापरात असलेले पाइप जळून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले.

पूर्ण घराला कवेत घेतले
रविवारी सकाळी साडेसहाला नीलकंठ यांच्या घरातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. परंतु, हिवाळा असल्याने धुके असल्याचे त्यांना वाटले. मात्र, धुराचे प्रमाण वाढतच गेले. जवळ जाऊन बघितले असता घराला आग लागल्याचे दिसले. सर्वांनी आरडाओरड केली. आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र, आगीने पूर्ण घराला कवेत घेतले. यामुळे पंधरा ते वीस क्विंटल कापूस, पंचवीस ते तीस पोती सोयाबीन, वीस पाइप, शेतीचे इतर साहित्य असे एकूण अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे आगपीडित शेतकरी नीलकंठ राघोर्ते यांनी सांगितले. 

शेजारच्या घरांनाही लागली आग 
माहिती मिळताच तहसीलदार बी. एन. तिनघसे यांच्या मार्गदर्शनात महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. नीलकंठ राघोर्ते यांचे शेजारी रमेश देशमुख व देवीदास सूर्यवंशी यांच्याही घराला आग लागली. आग लागल्याचे माहीत होताच विशाल तितरमारे, आशीष तितरमारे, सचिन देशमुख, संकेत मेश्राम, भोला खवास, नरेंद्र देशमुख, हिमांशू, किरण, रुषभ, हर्षल या तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्‍यात आणण्यात सहकार्य केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: soybean and cotton burned