सोयाबीनची आवक वाढली, मात्र लिलाव प्रक्रियेत दिरंगाई 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

उमरेड  (जि.नागपूर) ःगुरुवारी (ता.7) 7 हजार क्विंटलची आवक झाली असून भाव 3 हजार ते 3 हजार 675 असा होता. त्यानंतर लगेच शनिवारी 5 हजार 500 क्विंटलची आवक झाली. त्याला भाव 3 हजार ते 3 हजार 600 असा होता. अचानक आवक वाढली, मात्र अडते, व्यापारी शेतकऱ्यांच्या मालाची बोली लावण्यास टाळाटाळ करताना दिसतात.

उमरेड  (जि.नागपूर) ः  खरीप हंगामातील अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे अनेक कास्तकारांचे सोयाबीन पीक खराब झाले. बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा दर्जा खालावला. तरीही तालुक्‍यातील शेतकरी हाती आलेले सोयाबीनचे पीक आर्थिक अडचण दूर करण्यासाठी उमरेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नेण्यासाठी धाव घेताहेत. अचानक वाढलेल्या आवकीमुळे बाजार समितीचे नियोजन सैल झाल्याचे दिसून येते. 
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती ही नागपूर जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची आधी उत्पन्न असलेली बाजार समिती म्हणून ओळखल्या जाते. ऑक्‍टोबर महिन्यात सोयाबीनची आवक 10 हजार 740 क्विंटल नोंदविण्यात आली, तर भाव 3 हजार ते 3 हजार 710 असा होता. त्यानंतर झालेली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि पाठोपाठ आलेल्या दिवाळी सणादरम्यान माल खरेदी बंद असल्यामुळे कास्तकारांची दिवाळी अंधारात गेली. 

दिवाळी संपताच बाजार खुले करण्यात आले. गुरुवारी (ता.7) 7 हजार क्विंटलची आवक झाली असून भाव 3 हजार ते 3 हजार 675 असा होता. त्यानंतर लगेच शनिवारी 5 हजार 500 क्विंटलची आवक झाली. त्याला भाव 3 हजार ते 3 हजार 600 असा होता. अचानक आवक वाढली, मात्र अडते, व्यापारी शेतकऱ्यांच्या मालाची बोली लावण्यास टाळाटाळ करताना दिसतात. सकाळपासून ते पहाटेपर्यंत शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये मुक्काम करावा लागला. मात्र, बाजार समितीत त्यांच्या जेवणाची सोय नसल्यामुळे अनेकांची गैरसोय होताना दिसून आले. बाजार समितीत एकूण परवानाधारक 87 अडते, 55 व्यापारी तथा 34 मापारी, 12 मदतनीस व 139 असा एकंदरीत लवाजमा असूनसुद्धा शेतकऱ्यांची कुचंबणा होताना दिसत आहे. 

शेतकऱ्यांना शेतमाल तारण कर्ज 
बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना शेतमाल तारणकर्ज योजनेची घोषणा करण्यात आली असून शेतमालाच्या 70टक्‍के कर्जपुरवठा तातडीने पुरविण्यात येत असल्याचे सभापतींनी सांगितले. 50 पैसे प्रतिशेकडा दराने शेतमाल तारण ठेवला जाईल. गोदामभाडे व काटा भाड्यातून सूट देण्यात येणार असून पाहिजे तेव्हा मनासारखा भाव मिळाल्यास मालाची विक्री करून शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगितले. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा सातबारा, पेरेपत्र, आधारकार्डची झेरॉक्‍स, बॅंक खातेवही सोबत आणावी असे आवाहन करण्यात आले. 

अचानक मालाची आवक वाढल्यामुळे व सोयाबीनमध्ये ओलावा असल्याने व्यापाऱ्यांना बोली लावण्यास उशीर होतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मालविक्री करून माघारी जाण्यास विलंब होतो आहे. यावर लवकरच तोडगा काढला जाईल व शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. 
रूपचंद कडू 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybean arrivals increased, but the auction process was delayed