बोला, वाचनालय हवे का व्यापारसंकुल !

 कळमेश्‍वर ः46 वर्षे जुने पालिकेचे वाचनालय.
कळमेश्‍वर ः46 वर्षे जुने पालिकेचे वाचनालय.

कळमेश्वर(जि.नागपूर) ः "वाचाल तर वाचाल' अशी आपल्याकडे म्हण आहे. परंतु, वाचनाबाबत कुणी गंभीर नसेल तर काय? कळमेश्वरातील शहरातील मध्यभागी पालिकेचे सार्वजनिक वाचनालय असून या वाचनालयाची सदयास्थितीत कमालीची दुरवस्था झाली आहे. वाचनालय नको असेल तर त्याठिकाणी किमान व्यापारसंकुल तरी उभारावे, असा सल्ला शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. 

वाचनालयाची स्थापना 1973 साली माजी नगराध्यक्ष भालचंद्रराव देशमुख यांनी स्वतःच्या जागेत केली होती. आजवर 46 वर्षाचा कालावधी लोटूनही हे वाचनालय "जैसे थे' स्थितीत उभे आहे. आजवर अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेलेत. परंतु, या वाचनालयाची तसदी मात्र कुणास घ्यावीशी वाटली नाही. आजही हे वाचनालय देशमुख कुटुंबीयांच्या ताब्यात असून वाचनालय मात्र पालिका चालविते. परंतु, पालिका प्रशासनाने कधी ही जागा आरक्षित करून वाचनालयाचा विस्तार करण्याचा विचारच केला नाही. शहरातील मध्यभागी असलेल्या या वाचनालयात पूर्वी प्रचंड गर्दी असायची. सद्यस्थितीत हे वाचनालय फक्त वर्तमानपत्र वाचण्याचे केंद्र बनले आहे. गेल्या 3 वर्षांपासून पालिकेच्या उपाध्यक्ष असलेल्या यांच्या घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर हे वाचनालय असून त्यांचेसुद्धा याकडे दुर्लक्ष झाले आहे. अत्यंत मोडकळीस आलेल्या या "बाबा आदम'च्या काळातील वाचनालयात वाचकांच्या सोईसुविधांचा अभाव असून पुस्तकांची कमतरता, अशी या वाचनालयाची दुर्दशा झाली आहे.

कळमेश्वर ब्राह्मणी मिळून 35 हजारांच्या लोकसंख्येत हे एकमेव वाचनालय ठरते. या वाचनालयाची जागा भरपूर असून पालिकेने ठोस पावले उचल्यास या ठिकाणी वाचनालयासोबतच एक चांगले व्यापारसंकुल उभे राहू शकते. अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पालिकेच्या उत्पन्नातही भर पडू शकते. पालिकेतील सत्तारूढ गटाला दोन वर्षांचा उर्वरित कार्यकाळ असून या वाचनालयाचा आतातरी उद्धार करावा, अशी मागणी विद्यार्थी वर्गाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com