आता बोला! अनेक जण मोकळ्या जागेवरच जाळतात कचरा

गडचिरोली : खुल्या जागेवर कचरा जाळल्याने पसरलेला धूर.
गडचिरोली : खुल्या जागेवर कचरा जाळल्याने पसरलेला धूर.

गडचिरोली : नगर परिषदेने शहरात कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत. मात्र या कचराकुंडीत कचरा न टाकता त्याच्या अवतीभवती कचरा टाकून अनेक नागरिक मोकळ्या जागेवरच हा कचरा जाळतात. त्यामुळे परिसरात प्रदूषण वाढत आहे. याचा त्रास परिसरातील इतर नागरिकांना होत असून मोकळ्या जागेत कचरा जाळणाऱ्यांवर नगरपरिषदेने कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
स्थानिक श्रीकृष्णनगर येथील टेलिफोन एक्‍स्चेंजच्या वसाहतीसमोर असलेल्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकून आग लावली जाते. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धुराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषद प्रशासनातर्फे मोठी कचराकुंडीदेखील या मोकळ्या जागेवर ठेवण्यात आली आहे. मात्र या कचराकुंडीत कोणीच कचरा टाकत नाहीत. परिसरातील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. मुख्यत: या जागेच्या बाजूला लहान मुलांची कॉन्व्हेंटदेखील आहे. त्यामुळे या चिमुकल्या विद्यार्थ्यांचेदेखील आरोग्य धोक्‍यात आले आहे. स्वच्छता भारत अभियानाअंतर्गत नगर परिषदेतर्फे कोट्यवधी रुपये कचरा व्यवस्थापनाकरिता खर्च करण्यात आले आहे. मात्र अद्याप मोकळ्या जागेवर नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडाला आहे. बीएसएनएल वसाहतीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्या व कचऱ्याला आग लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. विशेषत: कचरा मोठ्या प्रमाणात टाकल्यामुळे लावलेली आगदेखील भीषण होत असते. त्यामुळे बाजूला असलेल्या शाळेला व खुल्या जागेत असलेल्या जनावरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच एका वसाहत परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे गोदाम नियमानुसार ठेवता येत नाहीत. मात्र या खुल्या जागेच्या परिसरात गोदाम असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकदेखील होते. नेहमीच नागरिकांना वाहतुकीस अडथळ्याचा समाना करावा लागतो. या खुल्या जागेत कचरा जाळणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दुर्घटनेचा धोका
आता पावसाळ्याचे दिवस संपले असून अनेकदा दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असते. तसेच वाराही वाहत असतो. अशावेळेस या मोकळ्या जागेतील कचऱ्याला लागलेली आग भडकून परिसरात पसरल्यास मोठी दुर्घटना घडण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकाराला प्रतिबंध घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com