विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या व्हॉट्‌सऍप मेसेजमुळे खळबळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

अमरावती - अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी आपण आत्महत्या करत असल्याचा संदेश सोशल मीडियावरून काही मित्रांना पाठविला. हा संदेश व्हायरल झाल्याने राज्याच्या पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली. 

अमरावती - अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी आपण आत्महत्या करत असल्याचा संदेश सोशल मीडियावरून काही मित्रांना पाठविला. हा संदेश व्हायरल झाल्याने राज्याच्या पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली. 

विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव रविवारी (ता. 6) कॅम्प परिसरातील आपल्या शासकीय निवासस्थानी होते. त्यांनी सायंकाळी सोशल मीडियावरून एक संदेश आपल्या काही मित्रांना पाठविल्याची चर्चा आहे. त्यात आत्महत्या करत असल्याचा उल्लेखसुद्धा होता, असे सांगण्यात आले. त्यामुळे राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयातून तत्काळ सूत्रे हलवली गेली. नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या निवासस्थानी पाठविण्यात आले. त्यानंतर काही डॉक्‍टर जाधव यांच्या शासकीय निवासस्थानी पोचले.

यासंदर्भात अमरावतीच्या पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला असता या संदेशासंदर्भात काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष पोलिस महानिरीक्षकांचे शासकीय निवासस्थान शहरात असल्याने वरिष्ठांनी पोलिस आयुक्तालयातसुद्धा या घटनेवर लक्ष ठेवण्याची माहिती दिली असण्याची शक्‍यता आहे; परंतु पोलिस आयुक्तांनीसुद्धा या संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात भाष्य करण्याचे टाळले. ग्रामीण वा शहर पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात मौन पाळले होते. 

जाधवांनी बोलण्यास दिला नकार 

विठ्ठल जाधव यांच्याशी सोमवारी संपर्क साधण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केला. दुपारी साडेबारापर्यंत जाधव आपल्या कार्यालयात आले नाहीत. बैठकीसाठी काही पोलिस निरीक्षक दोन तासांपासून त्यांच्या प्रतीक्षेत होते. जाधव हजर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला.

Web Title: Special IG whatsapp messages