कुपोषणमुक्तीसाठी विशेष पथदर्शी प्रकल्प

file photo
file photo

अमरावती : महाराष्ट्र राज्यातील एक हजार गावे "आदर्श ग्राम' म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची स्थापना करण्यात आली. या अभियानाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुंआ तर धडगाव तालुक्‍यातील माता व बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी रेकीट ऍण्ड बेनकायझर या कंपनीमार्फत विशेष पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील 104 व नंदूरबार जिल्ह्यातील 100 गावांची या पथदर्शी प्रकल्पासाठी निवड झाली आहे. या पथदर्शी प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास विभाग यांनी निवड झालेल्या गावांतील गर्भवती माता, स्तनदा माता तसेच कुपोषित बालकांची वाढ व विकासाचे काटेकोर ट्रॅकिंग करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामध्ये विशेषत: स्टटिंगचे (वयानुसार उंची-बुटकेपण) प्रमाण 40 टक्‍के व वेस्टिंगचे (उंचीनुसार वजन-लुकडेपण) प्रमाण 95 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रेकीट ऍण्ड बेनकायझर कंपनीचे संचालक रवी भटनागर यांच्या मार्गदर्शनात व प्लान इंडिया या संस्थेमार्फत हा पथदर्शी प्रकल्प पुढील 5 वर्षे राबविला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यांतील निवडलेल्या गावांमध्ये कम्युनिटी न्यूट्रिशन वर्कर (सीएनडब्ल्यू) यांची निवड केली आहे. आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्या बरोबरीने सी. एन. डब्ल्यू. कार्य करणार आहे.
नंदूरबार व अमरावती हे 2 जिल्हे कुपोषणासाठी अतिसंवेदनशील आहेत. येथील कुपोषणावर प्रतिबंध व उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाने बालकाच्या जीवनातील एक हजार दिवसांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. या काळातच बालकांचा बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकास होत असतो. हे 1000 दिवस म्हणजेच गरोदरपणातील 9 महिने ते बाळ 2 वर्षांचे होईपर्यंतचा काळ. या काळात गरोदर मातेची वजनवाढ योग्य क्षमतेने झाल्यास कमी वजनाचे बाळ जन्माला येणार नाही. कुपोषणावर प्रतिबंध होईल. सदर पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात झाली आहे.

माता व बालकांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी व्हीएसटीएफमार्फत न्यूट्रिशन इंडिया कार्यक्रम दोन जिल्ह्यात सुरू केला आहे. या पथदर्शी प्रकल्पाचे काटेकोर नियोजन होणार असून, ते व्हीएसटीएफच्या सर्व गावांमध्ये सुरू करण्याचा विभागाचा मानस आहे.
- रामनाथ सुब्रमण्यम, सीईओ, व्हीएसटीएफ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com