फरार आरोपींना पकडण्यासाठी "स्पेशल स्कॉड'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

नागपूर ः फरार आरोपींना पकडण्याकरिता नागपूर शहरातील पोलिस ठाणेनिहाय विशेष सेल स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती नागपूर खंडपीठाला सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली. तर नागपूर ग्रामीण अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी 417 आरोपी फरार असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.

नागपूर ः फरार आरोपींना पकडण्याकरिता नागपूर शहरातील पोलिस ठाणेनिहाय विशेष सेल स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती नागपूर खंडपीठाला सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली. तर नागपूर ग्रामीण अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी 417 आरोपी फरार असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.
अतिरिक्‍त पोलिस आयुक्त व पोलिस उपायुक्त (गुन्हे) यांच्या देखरेखीत शहरात पथक काम करणार आहे. या पथकात अतिरिक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक ललित वर्टीकर यांचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील 228 तर ग्रामीण भागातील 417 आरोपी फरार आहेत. विविध पोलिस ठाण्यांतर्गत शहरात 781 प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच 458 प्रकरणे ही गैरजमानती वॉरंट तर 217 जामीनपात्र वॉरंटची प्रकरणे आहेत. मोनिका राऊत यांनी 417 आरोपी फरार असल्याचे म्हटले आहे. काही आरोपींना अटक करून ट्रायल कोर्टासमक्ष हजर करण्यात आले होते. आरोपींना पकडण्याकरिता विशेष सेल तयार करा, असे आदेश हायकोर्टाने पोलिस विभागाला दिले होते. या आदेशानुसार सेल तयार करण्यात आला आहे. शहर स्तरावर पोलिस आयुक्तांच्या देखरेखीत तर ग्रामीण स्तरावर पोलिस अधीक्षकांच्या देखरेखीत सेल तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात न्या. रवी देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी गुरुवारी सुनावणी झाली. याप्रकरणी आता दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे. दरम्यान, नागपूर व अमरावती येथील पोलिस आयुक्तांनी तर उर्वरित जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी सेल स्थापन केल्याची माहिती हायकोर्टाला दिली आहे.
विविध न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अनेक आरोपी हजर राहत नसल्यामुळे अनेक दिवसांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले होते. त्यामुळे हायकोर्टाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. दहा वर्षे जुन्या फौजदारी प्रकरणांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा असलेल्या प्रकरणातील संभावित आरोपी फरार आहेत. यामुळे फौजदारी प्रकरणे प्रलंबित नाही तर या प्रकरणांची सुनावणीही रखडलेली आहे. काही आरोपी परप्रांतीय आहेत. काही आरोपी दिलेल्या पत्त्यावर मिळत नाहीत. नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील आरोपीही फरार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special squad arrested for absconding accused