असे तयार करा जैविक कीटकनाशक! शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण

खुशाल ठाकरे | Monday, 14 September 2020

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नष्ट करणाऱ्या कीटकांवर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी मेटॉराझियम एनीसोप्ली हे जैविक कीटकनाशक तयार करण्याचे प्रात्यक्षिक जिल्हाभर सुरू आहे.

देसाईगंज(गडचिरोली) : शेतकऱ्यांचा रासायनिक कीटकनाशकावरचा भर कमी व्हावा व त्यांच्या पैशांची बचत होण्यासह त्यांना रसायनांपासून असलेला धोकाही दूर व्हावा, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाडे यांच्या संकल्पेनतून जैविक कीटकनाशक प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात येत असून अनेक शेतकरी या प्रकल्पाचा लाभ घेत आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नष्ट करणाऱ्या कीटकांवर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी मेटॉराझियम एनीसोप्ली हे जैविक कीटकनाशक तयार करण्याचे प्रात्यक्षिक जिल्हाभर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून तालुक्‍यातील कोकडी येथे प्रगतशील शेतकरी केशव बन्सोड यांच्या घरी मेटॉराझियम एनीसोप्ली जैविक कीटकनाशक तयार करण्याचे प्रात्यक्षिक गावातील शेतकऱ्यांना करून दाखविण्यात आले. या प्रात्यक्षिकाकरिता मेटॉराझियम एनीसोप्ली कल्चर कृषी महाविद्यालय नागपूर येथून प्राप्त झाले आहे.

कीटकनाशक तयार करण्याकरिता १ किलो गूळ, २ किलो तांदळाचे पीठ, २ लिटर गोमुत्र, ५० ग्रॅम ईस्ट पावडर, १ लिटर मेटॉराझियम एनीसोप्ली कल्चर व १०० लिटर पाण्याचा वापर करून द्रावण तयार करण्यात आले. या द्रावणाचे ४ दिवसांत १०० लिटर जैविक कीटकनाशक तयार होणार असून याचा वापर शेतकऱ्यांना धानपिकावरील तुडतुडा व खोडकिडा नियंत्रणासाठी करता येणार आहे. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकावर शेतकऱ्यांकडून होणाऱ्या अतोनात खर्चात बचत होणार असून पर्यावरण संतुलन राखता येणार आहे. यासोबतच विषमुक्त अन्नसुद्धा उपलब्ध होणार आहे. या कीटकनाशक प्रात्यक्षिकासाठी तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम, कृषी पर्यवेक्षक युगेश रणदिवे, बीटीएम महेंद्र दोनाडकर, कोकडीचे कृषी सहायक सुधाकर कोहळे, कृषिमित्र बन्सोड यांनी सहकार्य केले.

सविस्तर वाचा - काही सेकंदात ओळखा तुमच्या अन्नातील भेसळ; हे उपाय करून बघाच

इत्थंभूत माहिती
या प्रकल्पात शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देण्यासह त्यांना जैविक कीटकनाशकाची इत्थंभूत माहिती देण्यात येत आहे. रासायनिक कीटकनाशकांमुळे होणारे नुकसान, जिवाला असलेला धोका, त्यांच्या वाढत्या किमती, या तुलनेत अतिशय स्वस्त, आरोग्यास अजिबात हानिकारक नसलेली जैविक कीटकनाशक कसे प्रभावी व फायदेशीर आहेत, हे पटवून सांगण्यात येत आहे.

संपादन - स्वाती हुद्दार