गांधी-आंबेडकर यांची वजाबाकी करू नका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नागपूर : भारतीय सार्वभौमत्वाला जेवढा धोका पाकिस्तान आणि चीनचा नाही, त्यापेक्षा मोठा धोका देशातील धर्मांध आणि जात्यंध्य लोकांपासून आहे. यामुळे भविष्यात गांधी-आंबेडकर यांची वजाबाकी करून चालणार नाही. महापुरुषांमधील संघर्ष बाजूला सारून त्यांच्या सामर्थ्यांची बेरीज करण्याची देशाच्या एकात्मतेसाठी गरजेचे आहे, असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 

कविवर्य प्रा. वामन निंबाळकर लिखित "वाहत्या जखमांचा प्रदेश ः आकलन आणि समीक्षा' आणि "चळवळीचे दिवस' या दोन पुस्तकांचे प्रकाशन सोमवारी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या ऍड. ना. ह. कुंभारे सभागृहात झाले. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्‍वस्त डॉ. गिरीश गांधी होते. केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य ऍड. सुलेखा कुंभारे, डॉ. शैलेंद्र लेंडे, स्नेहलता वामन निंबाळकर उपस्थित होते. सद्यःस्थितीत धर्मांधता संविधानावर टपलेली आहे. संविधानाला जात, धर्म बांधू शकत नाही. यामुळे वेगवेगळ्या कारणांनी घडविण्यात येत असलेला अस्वस्थ वर्तमान लोकशाहीतील अडथळा आहे, हेच कवी वामन निंबाळकर यांची कविता सांगते, असेही ते म्हणाले. 

साहित्य हा समाजाचा आरसा आहे. या आरशात समाजाचे पारदर्शक प्रतिबिंब दिसते, असे ऍड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या. डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी दोन्ही पुस्तकांवर भाष्य केले. डॉ. गिरीश गांधी यांनी निंबाळकर हे खऱ्या अर्थाने चळवळीतील पॅंथर होते असे सांगितले. प्रास्ताविक स्नेहलता निंबाळकर यांनी केले. संचालन डॉ. वीणा राऊत यांनी केले. स्नेहलता खंडागळे यांनी आभार मानले. 

साहित्यिकांची भूमिका निर्णायकांची 
सरकारने नुकतेच मराठा आरक्षण जाहीर केले. यामुळे मराठा आणि ओबीसींमध्ये दरी निर्माण झाली असून, स्फोटक स्थिती आहे. मराठ्यांचे शाहू महाराज, ओबीसींचे महात्मा फुले, दलितांचे आंबेडकर अशी महापुरुषांची विभागणी देशासाठी धोक्‍याची आहे. आज साहित्यिकांची भूमिका निर्णायकांची आहे. साहित्य जोडणारी प्रक्रिया आहे. बुद्ध, महावीर, पैगंबर, येशू, गांधी, फुले-आंबेडकर, आगरकर आदी महापुरुषांना जोडण्याच्या प्रक्रियेला कथा, कला आणि साहित्याच्या संस्कृती नायकांनी सुरू करावे. साहित्यातून पशुत्व संपेल आणि भारतीय माणूस जोडला जाईल. सर्वांना सत्याचा प्रकाश मिळेल, असे प्रा. सबनीस म्हणाले.

Web Title: Speech on Gandhi Ambedkar