‘कंबरतोड’ गतिरोधक; मर्जीनेच टाकले जातात हवे तेथे ‘ब्रेकर’

विवेक मेतकर 
रविवार, 12 मे 2019

पाच किलोमीटर अंतरावर अठरा ‘ब्रेकर’ 
जुने शहरातील वाशीम बायपास ते किल्ला चौक या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सुमारे अठरा गतिरोधक आहेत. लहान गाड्या, आॅटोचालक दर मिनिटाला येणाऱ्या ब्रेकरमुळे त्रस्त झाले आहेत. 

अकोला : वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी गतिरोधक आवश्यकच आहेत. पण, याच गतिरोधकांची नको तेथे, नको त्या जागी होणारी अडचण अकोलेकरांना सहन करावी लागत आहे. विशेष म्हणजे, जुने शहरातील वाशीम बायपास ते किल्ला चौक या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सुमारे अठरा गतिरोधक आहेत. एकाच रस्त्यावर बोटाच्या कांड्यावर नव्हे तर हातभर लिहिण्याइतकी संख्या असल्याने अकोलेकरांना नाहक खड्ड्यांसह ‘कंबरतोड’ गतिरोधकांचा त्रास सहन करावा लागत आहे. 

एखाद्या आजारावर उपचार म्हणून घ्यावे लागणारे औषध गरजेचेच आहे. मात्र, त्याचे वाढते प्रमाण अपायकारक ठरून घातक सिध्द होते. असाच काहीसा प्रकार अकोल्यातील रस्त्यांवर सुरू आहे. एकतर रिंगरोड आणि अशोक वाटिका चौक ते रेल्वेस्टेशन हेच दोन मुख्य मार्ग. या रस्त्याची दयनीय अवस्था पाहता शहरातील अंतर्गत रस्त्यांचा अंदाज येऊ शकतो. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था असतानाच हे याच खड्ड्याच्या रस्त्यावर नाहक टाकलेली गतिरोधके वाहनधारकांची मणक्यासह कंबर ढिली करत आहे. मात्र, असे असतानाही संबंधित प्रशासन याकडे डोळेझाक न करता अपघात आणि वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक टाकली आहेत, म्हणून जबाबदारी पुन्हा वाहनधारकांच्या माथीच मारत आहेत. असे असले तरी, जे रस्ते महानगरपालिकेच्या अंतर्गत आहेत. त्यावर नागरिक फक्त आणि फक्त आपल्या सोयीसाठी गतिरोधक टाकून वाहनधारकांच्या अडचणीत वाढ करत आहेत. 

अर्धवट गतिरोधक घातकच 
शाळा, महाविद्यालय आणि दवाखान्यांमधील गर्दी बघता अपघात टाळण्यासाठी गतिरोध तयार करण्यात येतो. मात्र, काही दिवसांनी रस्त्याच्या कडेला तो खंडीत असतो. यामुळे दुचाकी वाहनधारक गतिरोधक टाळण्यासाठी एकाच कडेने मार्ग काढतो. यात अपघाताची शक्यता मोठी असते. 

पाच किलोमीटर अंतरावर अठरा ‘ब्रेकर’ 
जुने शहरातील वाशीम बायपास ते किल्ला चौक या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सुमारे अठरा गतिरोधक आहेत. लहान गाड्या, आॅटोचालक दर मिनिटाला येणाऱ्या ब्रेकरमुळे त्रस्त झाले आहेत. 

पांढरे पट्टे कुठे गेले? 
गतिरोधक बनविताना सुरुवातीला त्यावर पांढरे पट्टे मारल्या जातात. मात्र, काहीच दिवसांत ते अस्पष्ट होतात. बेकायदा गतिरोधक काढता आले नाही तर वाहनचालकांच्या जागरुकतेसाठी किमान त्या ठिकाणी पांढरे पट्टे मारावेत अथवा गतिरोधकाच्या ४०० मीटर आधी सावधानतेचा फलक असावा. 

सावधानतेचे फलक कुठे तरीच 
शहरात अशास्त्रीय गतिरोधकांत मोठ्या संख्येने वाढत आहेत. शहरातील वाहनांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, जागोजागी असलेल्या गतिरोधकांच्या सावधानतेचा फलक जवळपास कोठेही आढळून येत नाही. 

गतिरोधकामुळे दुखापत 
या अशास्त्रीय गतिरोधकांमुळे नागरिकांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान तर होतच आहे. परंतु, नागरिकांना पाठदुखी आणि मानेचे विकार होत आहे. त्यातून अनेक नागरिकांना गंभीर स्वरुपाची दुखापतही झाली आहे. 

कुठल्याही निकषाशिवाय लोकल ठेकेदारांकडून तयार केलेल्या ब्रेकरमुळे अपघाताची शक्यता अधिक असते. कमीत कमी गतीने जाणाऱ्या वाहनधारकाला या ब्रेकरचा अनुभव येतो. मात्र, ४० च्या स्पीडने असलेल्या गाडीला त्याचा ‘फील’ यायला नको. वाहनधाकर ज्या पोजीशनमध्ये बसलेला असतो. त्यानुसार अशा ब्रेकरचा त्याच्या मणक्यावर त्वरीत परीणाम होतो. बरेचदा हाडांमधील गादी किंवा रक्तवाहिनी फाटण्याची शक्यताही जास्त असते. आज शहरात सर्वात जास्त रुग्ण हे मणक्यांच्या दुखण्याचे आणि कंबरदुखीचे रुग्ण आढळून येतात. 
- डॉ. अमोल रावणकार, अस्थिरोग तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: speed breaker in Akola