मेडिकलमध्ये स्पाइन इंज्युरी सेंटर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

या आजारांवर उपाय 
मानदुखी ही मुख्यतः मानेतील मणक्‍याचा आजार आहे. मणके झिजून त्यातील खुर्चा गादी दबणे, बारीक अस्थी गुठळ्या तयार होणे, यामुळे चेतारज्जू व बाहेर पडणाऱ्या नसांना घर्षण व इजा होणे अशा सर्व आजारांवर येथे उपचार होतील. याशिवाय अपघातामध्ये पाठीच्या कण्याला होणाऱ्या सर्व आजारांवर उपचार होतील, हे विशेष.

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) "स्टेट स्पाइन इंज्युरी सेंटर' उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव मेडिकलच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सामाजिक न्यायविभागाच्या पुढाकाराने हा प्रकल्प मेडिकलमध्ये उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला, हे विशेष. 

स्पाइन सेंटर उभारण्यात आल्यास पाठीच्या कण्यासह, मणक्‍याची बिनटाक्‍याच्या शस्त्रक्रिया होतील. रेडिओफ्रिक्वेन्सी लहरी व लेझर या प्रगत-शास्त्रीय उपकरणांद्वारे कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता रुग्ण वेदनामुक्त शस्त्रक्रिया येथे होतील. एक्‍स-रे (सी-आर्म) वर सुईचे टोकाद्वारे मणक्‍यावर शस्त्रक्रिया होतील. या शस्त्रक्रियेनंतर केवळ बारा तासांच्या विश्रांतीनंतर रुग्ण नेहमीचे काम सुरू करू शकतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मणक्‍याची हाडे व मणक्‍याला आधार देणाऱ्या स्नायूंना यात यत्किंचितही धक्का लागत नाही. मणक्‍याचे आरोग्य व रचना, दोन्हीही अबाधित राहतात. या तंत्रज्ञानाने अत्यंत सोप्या पद्धतीने व एका दिवसात या वेदनांचे निवारण होऊ शकते. मणक्‍यावरील अशा सर्व शस्त्रक्रिया येथे होतील. या सेंटरअंतर्गत दिव्यांगांचे सशक्तीकरण होणार आहे. यामुळेच केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या सेंटरसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. केंद्र शासनाच्या सामाजिक न्यायविभागाने 28 एप्रिल रोजी राज्य शासनाला पत्र लिहून या प्रकल्पासंदर्भात विचारणा केली होती. त्यानुसार, मेडिकलमध्येच उभारण्यासंदर्भातील सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात विभागप्रमुख डॉ. सजल मित्रा यांनी स्पाइन सेंटरचा अहवाल तयार केला आहे. राज्यात एकमेव सेंटर असणार आहे. राज्य शासनामार्फत हा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्यात येईल. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री गिरीश महाजनदेखील हे केंद्र उभारण्यासंदर्भात आग्रही आहेत. 

 

Web Title: Spine Center in Medical