सचिन येण्यापूर्वीच पावसाची बॅटिंग!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नागपूर - क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर येणार व त्याची एक झलक पाहायला मिळणार, या उत्सुकतेपोटी यशवंत स्टेडियमवर २० हजारांवर चाहत्यांनी गर्दी केली होती. खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप सुरू झाला असताना अचानक विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. आयोजकांना कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. 

नागपूर - क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर येणार व त्याची एक झलक पाहायला मिळणार, या उत्सुकतेपोटी यशवंत स्टेडियमवर २० हजारांवर चाहत्यांनी गर्दी केली होती. खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप सुरू झाला असताना अचानक विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. आयोजकांना कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. 

गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाचा शनिवारी सायंकाळी सहा वाजता सचिनच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार होता. सचिनचे चॅटर्ड विमान नागपूरच्या दिशेने निघालेही होते. इकडे यशवंत स्टेडियमवर कार्यक्रमाची सर्व तयारी झाली होती. सांस्कृतिक कार्यक्रमदेखील सुरू झाला. चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला असतानाच अचानक आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. पाहता पाहता जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. जवळपास पाऊण तास मेघजर्गना व विजांच्या प्रचंड कडकडाटांसह पावसाने स्टेडियम परिसरात जोरदार ‘बॅटिंग’ केली. त्यामुळे सर्वत्र पळापळ सुरू झाली. पावसात भिजू नये म्हणून कुणी खुर्च्या डोक्‍यावर घेतल्या, तर कुणी आडोसा शोधला. स्टेडियममध्ये जागोजागी लावण्यात आलेले कटआऊट्‌स, बॅनर्स आणि एलईडी स्क्रीन्स धडाधड खाली कोसळले. पावसाचा जोर पाहून व्यासपीठावर उपस्थित रणजी विजेत्या विदर्भ संघासह सत्कारमूर्तीही निघून गेले. 

स्थगितीची घोषणा
महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी सर्व नागपूरकर प्रेक्षकांचे आभार मानून, कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली. समारोपाची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

फडणवीस, गडकरीही आले नाही
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सचिन असला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महोत्सवाचे आयोजक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मात्र, वादळी पावसामुळे दोघेही कार्यक्रमस्थळी येऊ शकले नाही. 

शिवछत्रपती विजेते सन्मानित
मुख्य कार्यक्रमापूर्वी शहरातील १२० छत्रपती, एकलव्य, दादोजी, अर्जुन व अन्य क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. महापौर नंदा जिचकार व अन्य मान्यवरांनी त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. नागपूर क्रीडामहर्षी आणि २० क्रीडाभूषण पुरस्कार विजेत्यांची मात्र निराशा झाली.

सचिनचे विमान माघारी परतले
समारोप समारंभासाठी सचिन तेंडुलकर विशेष चॅटर्ड विमानाने नागपूरकडे निघाला. विमान सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सोनेगाव विमानतळावर दाखल होणार होते. मात्र, शहरात सगळीकडे वादळी पाऊस सुरू झाल्यामुळे विमान औरंगाबादकडे नेण्यात आले. पावसाळी वातावरण आणि कार्यक्रमाला झालेला उशीर लक्षात घेता विमान तिकडूनच मुंबईला परत गेले.  

Web Title: sports festival sachin tendulkar rain