ट्रायलरुममध्ये आढळला छुपा कॅमेरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर ः सीताबर्डीतील प्रसिद्ध फ्रेंड्‌स कपड्याच्या दुकानातील ट्रायल रुममध्ये व्हीडीओ चित्रीकरण सुरू असलेला स्मार्टफोन आढळून आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. खरेदीसाठी दुकानात आलेल्या एका तरुणीच्या हा प्रकार लक्षात आला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून मालक आणि नोकरास अटक केली आहे.

नागपूर ः सीताबर्डीतील प्रसिद्ध फ्रेंड्‌स कपड्याच्या दुकानातील ट्रायल रुममध्ये व्हीडीओ चित्रीकरण सुरू असलेला स्मार्टफोन आढळून आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. खरेदीसाठी दुकानात आलेल्या एका तरुणीच्या हा प्रकार लक्षात आला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून मालक आणि नोकरास अटक केली आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये अनेक अश्‍लील व्हीडीओ आढळले आल्याने महिला व मुली बदनामीच्या भीतीने घाबरल्या आहेत.
दुकानाच्या मालकाचे नाव किसन इंदरचंद अग्रवाल (वय 54, रा. प्लॉट 79, वर्धमान नगर) आणि नोकराचे निखिल ऊर्फ पिंटू दीपक चौथमल (वय 27, रा. शितला माता मंदिरजवळ, पाचपावली) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 17 वर्षीय युवती ही इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मित्रासोबत सीताबर्डी मेन रोडवरील "फ्रेंड्‌स' रेडीमेड कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी आली. तीने कुर्ती पसंत केली आणि "ट्रायल रूम'मध्ये गेली. कपडे बदलून झाल्यानंतर ती बाहेर आली. मात्र, तिला ट्रायल रूममध्ये मोबाईल लपवून ठेवल्याचा संशय आला. तिने याची माहिती मित्राला दिली. तेथूनच लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आले. सीताबर्डीचे पीएसआय विटोले पथकासह दुकानात पोहचले. त्यांनी ट्रायल रूमची तपासणी केली असता तेथे लपवून ठेवलेला स्मार्टफोन आढळला.
तरुणीच्या तक्रारीवरून दुकानाचा मालक व नोकरावर गुन्हा दाखल करण्यात आला.
"फ्रेंड्‌स'मध्ये विद्यार्थिनीची गर्दी
सीताबर्डी मेन रोडवरील फ्रेंड्‌स दुकानात शहरातील अनेक नामांकित कॉलेजचे युनिफॉर्म मिळतात. त्यामुळे या दुकानात युवतींची वर्दळ असते. हा प्रकार केव्हापासून सुरू आहे हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र दुकानात नियमित येणाऱ्या महिला ग्राहाकांना महिला या वृत्ताने चांगल्याच धास्तावल्या आहेत.
मुलींनो पुढे या... तक्रार करा
मुलींच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन अनेक कपड्यांच्या दुकानात असे प्रकार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अनेकांचा अश्‍लिल एमएमएस तयार करण्याचा गोरखधंदा आहे. त्यामुळे या प्रकरणापासून धडा घेत तरुणींनी ट्रायल रूम वापरण्यापूर्वी दक्षता घ्यावी. तसेच सीसीटीव्ही, स्पाय कॅमेरा किंवा मोबाईल आढळल्यास हिम्मत दाखवून तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spy camera in changing room