एसटी बसने सायकलस्वारास चिरडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

- वर्धा-आर्वी मार्गावरील पिंपळखुटा येथील घटना
खरांगणा (जि. वर्धा) : महामंडळाच्या तळेगाव डेपोच्या मोर्शी-वर्धा बसने सायकलवर इंधनाची मोळी घेऊन जाणाऱ्या व्यक्‍तीस चिरडले. वर्धा-आर्वी मार्गावरील पिंपळखुटा येथे सोमवारी (ता. चार) सकाळी 11 वाजता हा अपघात घडला. गणेश भीमराव रंगारी (वय 47) रा. पिंपळखुटा, असे मृताचे नाव आहे.

खरांगणा (जि. वर्धा) : प्राप्त माहितीनुसार, गणेश रंगारी हे सायकलने जंगलातून जळाऊ इंधनाची मोळी घेऊन येत होते. थकवा आल्याने ते रस्त्याच्या कडेला सायकलवर इंधनाची मोळी घेऊन थांबले. त्याचवेळी आर्वीकडून वर्ध्याकडे जाणारी बस (क्र. एमएच 40-वाय 5309) आली. ही बस पिंपळखुटा येथे न थांबता थेट वर्ध्याकडे निघाली. दरम्यान, भरधाव बसने सायकल घेऊन उभ्या असलेल्या गणेश रंगारी यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्या सायकलीचा चेंदामेंदा झाला.
अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. जखमी अवस्थेत गणेश रंगारी यांना खासगी वाहनामध्ये टाकून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेले, पण नशिबाने साथ दिली नाही. तिथे पोहोचताच रंगारी यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या डोक्‍याला जबर मारला होता. त्यामुळे काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी खरांगणा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
प्रवासी थोडक्‍यात बचावले
एसटी बसमध्ये 80 पेक्षा जास्त प्रवासी होते. बस दगडाला अडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण लागूनच मोठा नाला होता. बस उलटली असती तर थेट नाल्यात गेली असती. दगड आडवा आल्याने मोठा अनर्थ टळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ST bus crushed the bicyclist