वाहकास सोडून एसटी भुर्रकन्‌ निघून गेली!

कोदामेंढी - वाहकाला सोडून निघून जाणारी बस.
कोदामेंढी - वाहकाला सोडून निघून जाणारी बस.

कोदामेंढी - वेळ सकाळी सव्वा अकराची. रामटेक आगारातून साडेदहाला सुटणारी रामटेक आगाराची बस कोदामेंढी बसस्थानकावर जवळपास सव्वाअकरा वाजता पोचली. बस थांब्यावर थांबली. वाहक कोणाशी तरी बोलत असताना चालकाने एसटी पुढे दामटली. काही दूर गेल्यानंतर वाहकाने फोन करून परिस्थिती लक्षात आणून दिली. तेव्हा कुठे बस परत आली व वाहकाला घेऊन निघून गेली. हा प्रकार पाहून उपस्थितांना हसू आवरणे कठीण झाले होते.

एसटी महामंडळाची बस येथील बसस्थानकावर थांबा घेत नसून आडोशाला वाटेल तिथे थांबा  घेते. त्यामुळे प्रवाशांना बसच्या मागे धावण्याशिवाय प्रवाशांना पर्याय नसतो. बरेचदा प्रवाशांना बस आली की गेली, हेही माहीत होत नसते. अशातच येथील ग्रामपंचायत  सदस्य अतुल लिमजे यावेळी बसस्थानक परिसरात होते. त्यांनी प्रत्यक्षदर्शनी हा प्रकार बघितला आणि बसवाहकास बोलावून घेतले. तुम्ही एसटी बस बसस्थानकावर थांबवित नसल्याने प्रवाशांची तारांबळ होत असते. पाच लाख रुपये खर्ची करून एसटीकरिता वाहनतळ बनविण्यात आले. त्यामुळे बस या थांब्यावर थांबवीत चला, असे सांगितले. दोघांची चर्चा सुरूच होती आणि काय तर बघता बघता एमएच ४० एन ८५७४ क्रमाकांची एसटी बसचालक घेऊन निघून गेला.

एसटी बसला थांबा घेण्याकरिता बसवाहक एकदा घंटी मारतो तर थांबा घेऊन पुढील प्रवासाकरिता दोनदा घंटी मारावी, असा नियम आहे. वाहकाने दोनदा घंटी न मारताच बस पुढे निघून गेली  कशी, असा सवाल निर्माण झाला. बस निघून गेली आणि बसवाहक येथेच थांबले असल्याने नेमके झाले काय, या आशेने लोकांनी बघ्याची गर्दी केली होती. एसटी बस वाहकास सोडून  निघून गेली असे लोकांना माहिती होताच लोकंही विचारात पडले आणि हसू लागले.

बस वाहकाजवळ चालकाचा मोबाईल नंबर असल्याने त्याने फोन करून एसटी परत कोदामेंढी बसस्थानकावर बोलावली आणि वाहक एसटीत बसून दोनदा घंटी मारीत एसटी भुर्रकन भंडाऱ्याकडे निघून गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com